Category: IPH

World Mental Health Week Special Series (Part 4)

मनविज्ञान : काल, आज आणि उद्या

मनोविकारांच्या क्षेत्रातील औषधविज्ञानामध्ये गेल्या दोन दशकांमध्ये विलक्षण वेगाने प्रगती होत आहे. सुमारे अडतीस वर्षांपूर्वी मी जेव्हा पदव्युत्तर शिक्षणाला सुरुवात केली, त्यावेळी या क्षेत्रातील औषधांना सरसकट ‘झोपेची औषधे’ असं म्हटले जायचे. आजचे वास्तव त्यापेक्षा खूपच बदललले आहे. पूर्वीची औषधयोजना आजारावर ‘कार्पेट बॉम्बिंग’ अर्थात सर्वग्राही हल्ला करायची. आताची औषधयोजना ही अधिक धारदार म्हणजे ‘सर्जिकल स्ट्राइक’सारखी असते. आज मनोविकारांच्या प्रकाराप्रमाणे तसेच लक्षणांप्रमाणे औषधयोजना करता येणे शक्य होत आहे. ‘झोप आणणाऱ्या’ हे शब्द हळूहळू अर्थहीन होत आहेत. परंतु, अजूनही अनेकांच्या मनातला हा दुराग्रह हटायला तयार नाही.
विचार, भावना आणि वर्तन या त्रिमूर्तीचे एक रूप आहे. मेंदूमधील अनेक जीवरसायने अर्थात Neurotransmitters, आणि त्यांच्या व्यवस्थेतील संतुलन… या व्यवस्थेमध्ये असमतोल निर्माण झाला आणि तो टिकाऊ स्वरूपाचा झाला की ‘मनस्तापाची’ लक्षणे दिसू लागतात. आधुनिक विज्ञानाने या व्यवस्थेचा अभ्यास करणारी औषधशास्त्रीय प्रणाली तर निर्माण केलीच. पण, कोणत्या मनोविकारांमध्ये नेमक्या कोणत्या जीवरसायनांचा असमतोल होतो हे शोधून काढले… हा असमतोल दूर करणारी रसायने बाहेरून दिली असता ती दोन मज्जापेशीमधल्या अवकाशामध्ये (Synapse) पोहोचू शकतात…. विचार, भावना, वर्तन नॉर्मलला आणणारी औषधे हा खरे तर क्रांतिकारक बदल आहे. परंतु, जनमानसाने त्याला अजूनही पूर्णत: स्वीकारलेले नाही. कारण ‘माझे मन सदासर्वदा माझ्या ताब्यात असायलाच हवे’ हा हट्टाग्रह…
शरीराचे आजार आणि वेदना यांचा स्वीकार आपण मोकळेपणाने करतो. त्यामुळे त्या संदर्भातील मदत आणि उपचार घेण्यास आपल्याला कमीपणा वाटत नाही. ‘मानसिक त्रासावर मदत घेणे म्हणजे माझी नाचक्की’ हा मनातला ग्रह. ही नाचक्की दोन प्रकारची… स्वत:च्या नजरेतून खाली पडणे आणि समाजासमोर माझी ही कमतरता किंवा व्यंग उघडे पडणे… योग्य वेळी उपचार सुरू न झाल्यास शास्त्राच्या प्रगतीपासून व्यक्ती वंचित राहत असते.
मानसिक आरोग्याच्या संदर्भातील ‘Stigma’ अर्थात कलंक धुवून काढण्याचे प्रयत्न अनेक शतकांपासून सुरू आहेत. युरोपामध्ये पिनेल नावाच्या डॉक्टरने मनोरुग्णांच्या हातापायातील बेड्या प्रथम तोडल्या. भारतामध्ये डॉ. विद्यासागर ह्यांनी मनोरुग्णालयातील रुग्णांना कुटुंबीयांसमवेत राहून उपचाराची संधी दिली. मद्रासच्या डॉ. शारदा मेनननी सरकारी मनोरुग्णालयातील बऱ्या झालेल्या रुग्णांना समाजामध्ये पुर्नस्थापित करण्याचे यशस्वी प्रयत्न केले. त्यांच्या प्रेरणेतून चेन्नईमध्ये SCARF अर्थात स्किझोफ्रेनिया रिसर्च फाऊंडेशन ही संस्था सुरू झाली. बेंगळुरूच्या राष्ट्रीय मनोविज्ञान संस्थेचे डॉ. श्रीनिवास मूर्ती आणि चंदीगडच्या PGI इन्स्टिट्यूटचे डॉ. विग या दोघांनी सरकारी सेवेतील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रथमच मनोविकारांवरील उपचारांचा समावेश केला.
जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या प्रक्रियेनंतर ‘मानसिक आरोग्य’ या संकल्पनेची व्याख्या बदलायला सुरुवात झाली. मनोविकार (Disorder), विसंवाद (Distress) आणि विकास (Development) अशा तिन्ही पातळ्यांवर आपण मनाचा विचार करायला हवा, असा प्रवाह आला. या संदर्भातील भारतीय प्रवासाच्या आढाव्यासाठी यावर्षी आकाशवाणीच्या पु. म. लाड हीरकमहोत्सवी व्याख्यानमालेतील माझे व्याख्यान, AVAHAN IPH या आमच्या नि:शुल्क यू-ट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे.… महत्त्वाचा मुद्दा असा की मानसिक आरोग्याचे महत्त्व जाणवणे आणि त्यासंदर्भात विनासंकोच मदत घेणे या प्रक्रियेसाठी सामाजिक सहभागाची आवश्यकता आहे. अमेरिकेमध्ये आता एक नवा विचार मूळ धरत आहे, ‘Positive Psychiatry.’ ह्याचा अर्थ असा की ‘मनोविकासासाठी मनोविकारशास्त्र.’
मनोविकारांमध्ये सहसा टोकाच्या नकारात्मक भावना असतात. सकारात्मक भावनांमध्येही, स्वकेंद्रिततेच्या पलीकडे नेणाऱ्या खास अशा उन्नत भावना असतात असे विज्ञानाच्या लक्षात आले. मेंदूच्या Prefrontal Cortex ह्या भागातून निर्माण होणाऱ्या या भावनांना म्हणतात Neocortical Emotions.… आस्था, करुणा, नम्रता, कृतज्ञता, तन्मयता, समर्पण, क्षमा, संयम, निरामयता अशी ही यादी आहे. पूर्वीचे स्कॅन्स मेंदूच्या रचनेबद्दल माहिती द्यायचे. PET आणि SPECT या स्कॅन्समुळे शास्त्रज्ञांना मेंदूमधल्या घडामोडींचा अक्षरश: ‘आँखो देखा हाल’ कळू लागला… अमूर्त समजल्या जाणाऱ्या भावनिक अनुभवाचे चक्क ‘दृश्य-मेंदू-मापन’- Visual-Brain-Mapping करता येऊ लागले. प्रत्येक माणसामध्ये दडलेला संत आणि हिंस्र जनावर ही कल्पना नव्हे तर वैज्ञानिक सत्य आहे.
उन्नत भावनांचा जाणीवपूर्वक सराव केला तर मेंदूचे भावनिक वास्तव विकासाकडे जाऊ शकते हे सिद्ध करणारे आणखी एक तत्त्व पुढे आले. त्याचे नाव Neuroplasticity. मेंदूच्या पेशींच्या क्षमतेमध्ये कोणत्याही वयोगटामध्ये कार्यात्मक बदल घडवून आणता येतो असे शास्त्रज्ञ म्हणू लागले आहेत. या Neuroplasticityमध्ये बिघाड झाला तर उतारवयात स्मृतीभ्रंशासारखे विकार होऊ शकतात, असे वेगवेगळ्या पाहणीतून दिसते. जर हे कार्य पुन्हा स्थापित करता आले तर आज उपचारांसाठी असाध्य असणाऱ्या उतारवयातील मेंदूआजारांसाठी ते वरदान ठरणार आहे.
उन्नत भावनांची अभिव्यक्ती म्हणजेच वाढत चाललेल्या आत्मकेंद्रीत विचारप्रणालीला आळा घालणे असा सूर आता निघत आहे. या उन्नत भावनांच्या शोधामुळे अध्यात्म आणि विज्ञान ही दोन टोके नसून त्या दोघांमध्ये एक सामायिक धागा आहे ही विचारधारा पुढे आली असून आता अनेक पाश्चिमात्य मज्जाशास्त्रज्ञ आता ‘न धार्मिक अध्यात्म’ म्हणजे ‘Nonreligious Spirituality’ चा पुरस्कार करू लागले आहेत. या पद्धतीची स्पष्ट भारतीय मांडणी विनोबांनी अनेक दशकांपूर्वी करून ठेवली. या द्रष्टेपणाची नोंद करणे आवश्यक आहे.… मानसऔषधशास्त्राच्या संदर्भातही असेच द्रष्टे विधान खुद्द फ्रॉइडने केले होते, ‘अशी एक वेळ येईल जेव्हा मनाची कोडी उलगडण्याचे सामर्थ्य असणारे परमाणू (Molecules) तयार होतील.’
मानवी विकासाच्या संकल्पनेमध्ये एक गोष्ट गृहीत धरली जात होती की जनुकीय रचना ही मानवाच्या आयुष्यामध्ये ‘तटस्थ’ असते. संस्कार आणि संस्कृती (Nurture & Culture) यांचा परिणाम जनुकांमधल्या DNAवर होऊ शकतो, या भूमिकेतून Epigenetics या विद्याशाखेचा जन्म झाला. मनोविज्ञानाच्या दृष्टीने उन्नत भावना (Neocostical Emotions), मज्जातरलता (Neuroplasticity) आणि Epigenetics या तिन्ही संकल्पनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मानवजातीच्या भवितव्याबद्दल अत्यंत नकारात्मक अशी भाकिते करणाऱ्यांना यामुळे काहीसा आळा बसेल. याचा अर्थ भविष्य अगदी गोड-गुलाबी आहे असे नव्हे. परंतु ‘विज्ञानविवेक’ या संगमातून उद्याच्या उन्नत मानवाची निर्मिती होऊ शकेल.
आपल्या देशासमोर असलेली मनविज्ञानातील आव्हाने अजूनही अतिशय पायाभूत आहेत. या क्षेत्रातील व्यावसायिकांची संख्या; गरज आणि लोकसंख्या या दोन्ही बाजूने तुटपुंजी आहे. जे व्यावसायिक कार्यरत आहेत त्यांना मिळणाऱ्या प्रशिक्षणाच्या दर्जामध्ये कमालीची तफावत आहे. मानसिक आरोग्याच्या तीन विभागांपैकी, तीव्र मनोविकारांवर उपचार करण्यामध्येच त्यांची ऊर्जा इतकी वापरली जाते की विसंवाद आणि विकास यावर योगदान देण्यासाठी वेळ, कौशल्य, संधी या साऱ्याच गोष्टी कमी पडत आहेत. याचा आणखी एक परिणाम असा होत आहे की मनोविज्ञानाचा सामाजिक आणि सांस्कृतिक ठसा काही उमटू शकलेला नाही. आज मानसिक आधारासाठी सामान्य जनता वैदूंपासून आध्यात्मिक क्षेत्रातील उद्योजकांपर्यंत सर्वांकडे वळते; कर्मकांडांचे देव्हारे माजवणाऱ्या किंवा रत्ने-हिरे-दगड-अंगठ्या-माळा विकणाऱ्यांच्या संस्था-कंपन्या भरभराटीला येतात आणि अनेकांच्या असहाय्यतेचा अवैज्ञानिक फायदा घेऊन त्यांचे शोषण केले जाते हा भारतातील मनविज्ञान चळवळीचा पराभवच म्हणायला हवा.
पण म्हणून काही हातावर हात ठेवून बसायचे नाही. आधुनिक मनोविज्ञानाला भारतीय संस्कृती आणि विचारधारेतील पुरोगामी प्रवाहाशी जोडणे अगत्याचे आहे. समाजातील प्रत्येक विवेकी आणि आस्था असणारी व्यक्ती ही मानसिक आरोग्याचा संदेश पुढे नेणारी शक्ती आहे; अशा प्रकारे माध्यमांद्वारे प्रबोधन होणे गरजेचे आहे. मनोविज्ञान क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक, कार्यकर्ते आणि सुजाण व्यक्ती तसेच समूह अशा सर्वांनी एकत्र येऊन काम केल्याशिवाय ‘सुदृढ मन सर्वांसाठी’ हे ध्येयस्वप्न प्रत्यक्षात उतरणार नाही.
बदल तर होत राहणारच… तोच तर काळाचा प्रवाह… पण ‘परिवर्तन’ व्हायचे तर त्यासाठी जाणीवपूर्वक आणि सातत्याने केलेले प्रयत्न हवेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह आणि जागतिक मनोआरोग्य दिन (१० ऑक्टोबर) असे महत्त्वाचे कालखंड येत आहेत. ह्या निमित्ताने आपण सर्वजण मनआरोग्यविषयक जाणिवा विस्तारणाऱ्या एकातरी उपक्रमामध्ये सहभागी होऊ या, व्यक्तिविकासासाठीचा एखादा मार्ग निवडू या आणि एकमेकांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होऊन विवेकाचा विचारदीप प्रज्वलित करूया.

World Mental Health Week Special Series (Part 2)

मनविज्ञान : काल, आज आणि उद्या

पहिले महायुद्ध संपले आणि त्यानंतर युद्धभूमीवरून परत आलेल्या सैनिकांमध्ये अक्षरश: हजारोजण असे होते जे शारीरिक दृष्टीने व्यवस्थित होते पण मानसिक दृष्टीने गलितगात्र झाले होते. या अवस्थेला म्हणायचे ‘शेल शॉक’. दुसऱ्या महायुद्धाचे ढग जसे गडद होऊ लागले, तसेच मनोविज्ञान क्षेत्रातल्या डॉक्टरांचा विचार सुरू झाला की यावेळी असे झाले तर करायचे तरी काय?
ही कसोटीची वेळ आली ‘डंकर्क’च्या निमित्ताने. फ्रान्सच्या किनाऱ्यावर अडकून पडलेल्या लाखो ब्रिटिश सैनिकांची समुद्रमार्गे सुटका करण्याची मोहीम मानवी इतिहासात अद्वितीय मानली जाते. ख्रिस्तोफर नोलेन या दिग्दर्शकाचा याच नावाचा चित्रपट अतिशय प्रभावी आहे…. ब्रिटिश खाडी पार करून किनाऱ्यावर आलेले हे सैनिक मानसिक दृष्टीने खचलेले होते. त्यांचा निद्रानाश कमी करण्यासाठी, थकवा कमी करण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक होते. यामध्ये एक सैनिक असा होता ज्याची वाचा गेली होती आणि उजवा हात संपूर्णपणे लुळा पडला होता. त्याची अवस्था तीव्र होती. झोपेच्या गोळ्या काम करत नव्हत्या. म्हणून त्याच्या नसेमध्ये ‘सोडियम पेंटोथाल’ नावाचे गुंगी आणणारे औषध दिले गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अर्धवट झोपेत तो बोलायला लागला…हा सैनिक माघारी येत असताना एका खंदकामधून त्याला कण्हण्याचा आवाज आला. पहातो तर आपला भाऊच तिथे जखमी अवस्थेत. खांद्यावर घेऊन जावे तर गती कमी होणार. किनाऱ्यावर वेळेत पोहोचलो नाही तर सुटेकसाठी आलेली जहाजे निघून जाणार…. जखमी भावानेच त्याची द्विधा अवस्था संपवली.
तो म्हणाला, ‘मला मृत्यूदान दे’, जिवावर दगड ठेवून एका भावाने दुसऱ्या भावाला, उजव्या हाताने गोळी घातली. या कृत्याची खंत इतकी खोल की, त्याची वाचा ‘गेली’ आणि ‘तो’ हात लुळा पडला…. आज आपण ज्याला ‘नाटकोअनॅलिसिस’ म्हणतो त्याचा शोध हा असा लागला. या पद्धतीमुळे एक गोष्ट सिद्ध झाली की मनाचा पगडा शरीरावर किती प्रमाणात असतो…, जी कहानी झोपेची तीच भूकेची. या सैनिकांच्या त्वरीत पोषणासाठी एक पद्धत वापरली जायची. आधी इन्शुलिन देऊन त्यांच्या शरीरातली साखरेची पातळी खूप कमी करायची आणि मग भरपूर साखर त्यांना पोटामध्ये घातलेल्या नळीतून द्रवरूपाने द्यायची. याला म्हणायचे ‘इन्शुलिन कोमा’ शास्त्रज्ञांना दिसून आले की या उपचारानंतर त्या सैनिकाची भाविनक स्थितीही स्थिर होते. पण युद्धकाळ असल्याने साखर गेली ‘रेशनिंग’च्या नियंत्रणाखाली. मग उकडलेल्या बटाट्यांचे किसलेले घट्ट द्रावण देण्यात येऊ लागले. पण आता हा पेशंट ‘कोमा’मध्ये असताना हवाईहल्ला झाला तर… तर मग इतपतच बेशुद्ध करा की वेळ आली तर हलता येईल. त्यातून तयार झालेली ‘इन्शुलिन सबकोमा थेरपी’. युद्धकाळामध्ये सैनिकांना मदत करता करता त्यातून मनोपचारांना विकसित करणाऱ्या ह्या साऱ्या संशोधकांपुढे नम्र व्हायलाच हवं.
दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरच्या छळछावण्यांमध्ये बंदी असलेल्या डॉ. व्हिक्टर फ्रॅन्केल या सायकोअॅस्ट्रोस्टेनेही या काळामध्ये, मानसशास्त्रात मोलाची भर घातली. ज्या व्हिएन्ना शहरामध्ये फ्रॉइड रहायचा त्याच शहरात फ्रॅन्केल आपली प्रॅक्टिस करत होते. युद्धकाळात फ्रॉइड इंग्लंडला जाऊ शकले. व्हिक्टर फ्रॅन्केलनी मात्र ज्यू असूनही व्हिएन्ना न सोडण्याचा निर्णय घेतला. आपल्या आईवडिलांची काळजी घेता यावी म्हणून अमेरिकेला जाण्याचा परवाना मिळूनही ते युरोपात राहिले. परिणाम व्हायचा तोच झाला. कॉन्सट्रेशन कॅम्पमध्ये खासगी कुटुंबीयांपासून ताटातूट, अतोनात हाल. एक अत्यंत हरलेल्या क्षणी फ्रॅन्केलना जाणवलं, ‘ते माझ्याकडून सर्व काही हिरावून घेऊ शकतात. माझे जगणेसुद्धा. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या अस्तित्वाकडे आणि जगण्याकडे कसे पहावे याचे स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.’ ‘मॅन्स सर्च फॉर मिनिंग’ या अजरामर पुस्तकामध्ये हे सारे अनुभव विस्ताराने वाचायला मिळतील. पुढे फ्रॅन्केलनी ‘लोगोथेरपी’ ही मानसोपचारपद्धती विकसित केली. लोगो ह्या शब्दाचा अर्थ आहे मिनिंग! जगणे अर्थपूर्ण बनवणारी मानसोपचारपद्धती …अनुभव कसाही असो, त्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन ठरवतो की मनात कोणत्या भावना निर्माण होणार. ते… ह्या तत्त्वातून जन्म झाला cognitive behavioral therapy अर्थात सीबीटी या उपचारपद्धतीचा पुढच्या काळात अॅरन बेक ह्यांनी ही पद्धती युरोप-अमेरिकेमध्ये रुजवली.
व्हिएन्ना शहरामध्ये, फ्रॅन्कोल ह्यांचे निवासस्थान आणि म्युझियम काही वर्षांपूर्वी मी शोधले. तिथे जाऊन या महान शास्त्रज्ञाच्या स्मृतींना उजळा देताना एक वाक्य मनात कायमचे कोरले गेले, ‘वास्तुविज्ञानामध्ये उत्तेजना (stimulas) आली की प्रतिक्रिया (reaction) येणार. मनोविज्ञानामध्ये मात्र उत्तेजना आणि प्रतिक्रिया या दोहोंच्यामध्ये एक पोकळी असते, एक अवकाश असतो.’ त्या अवकाशात असतो Cholce… आपण react व्हायचे की प्रतिक्रिया द्यायची का, प्रतिसाद घ्यायचा याची जबाबदारी त्या व्यक्तीलाच घ्यायची असते.
याच कालखंडावर आधारित एक प्रसिद्ध चित्रपट आहे, ‘लाइफ इज ब्युटीफूल’ या शीर्षकाचा. रॉबर्टो बेनिनी या दिग्दर्शक अभिनेत्याचा. फॅन्केलने माणसाच्या दृष्टिकोनाच्या संदर्भात जे सांगितले ते प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर हा चित्रपट पाहायलाच हवा. तर दुसऱ्या महायुद्धानंतर मनोविज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्त्वाची घटना घडली. छिन्नमनस्कता अर्थात स्क्रिझोफ्रेनिया ह्या आजारावरचे पहिले औषध Chlorprumazine अर्थात Largactil बाजारात आले. ज्यांचे परिणाम म्हणजे Actions आहेत. Large म्हणजे बहुआयामी असे Largactil . गंमतीची गोष्ट म्हणजे ‘ओकारी थांबवण्यासाठी’ म्हणून या रसायनावर प्रयोग सुरू होते आणि शोध लागला मनोविकारांवरच्या पहिल्या औषधाचा. पन्नासच्या दशकातच त्यामध्ये भर पडली. imipramine ही पहिली नैराश्यविरोधी औषधी. ही होती मनचिकित्सा औषधशास्त्राची पहाट. महत्त्वाची गोष्ट अशी की खुद्द फ्रॉइडनेही असे भाकीत वर्तवले होते की, ‘असा एक दिवस येईल जेव्हा मनाच्या रहस्यांची उकल करतील रसायनांचे परमाणू.’ सुरुवातीला या औषधसंशोधनाला फारशी गती नव्हती. वैश्विकीकरणाच्या प्रक्रियेला अजून बराच अवधी होता.
दरम्यानच्या काळात म्हणजे १९५०च्या दशकामध्ये अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनच्या वार्षिक सभेमध्ये एक शोधनिंबध वाचला गेला. अबोध जाणिवांवर आधारित सायकोअॅनॅलेसिस या प्रस्थापित मानसोपचार पद्धतीला छेद देणारा सिद्धांत मांडत होते. डॉ. व्हिक्टर फ्रॅन्केल यांच्या युरोपातल्या भूमिकेमध्ये सूर मिळवणारे अमेरिकेतले डॉ अल्बर्ट एलिस!

 

World Mental Health Week Special Series (Part 1)

मन-विज्ञान : काल, आज आणि उद्या

संस्कृतीच्या विकासाच्या एका टप्प्यावर ‘आरोग्य विचार’ हा कप्पा उघडला गेला. प्राचीन वैद्यक विचारामध्ये एक मूलभूत जाणतेपण, शहाणपण होते. शरीर आणि मनाची अभिन्नता त्यात मान्य केली होती. ‘प्रकृति इति शरीरं, प्रकृति इति स्वभावं’ अशी व्याख्या सांगणाऱ्या आयुर्वेदाचे प्रतिध्वनी चिनी आणि ग्रीक पद्धतींमध्येही सापडतात. आधुनिक वैद्यकशास्त्राचा आद्यप्रणेता समजला गेलेला पितामह हिप्पोक्रॅटीस म्हणायचा की आजाराचे योग्य निदान करायचे तर त्यासाठी लक्षणांची चिकित्सा (History Taking), शरीर तपासणी (Clinical Examination), नातेवाईकांबरोबरची बातचीत (Objective Data) ह्या सोबतच कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत? . . . समुद्रसपाटीपासूनची त्या स्थळाची उंची, पाणीपुरवठ्यामधली शुद्धता, हवामान आणि वाऱ्याची दिशा असे सारे घटक लक्षात घ्यायला हवेत . . . आता बोला, सर्वसमावेशक वैद्यकविचार ह्यापेक्षा काय वेगळा असतो? रुग्णाची नाडी तपासताना त्याचा हात कसा अलगद धरायचा, ऋजु भाषेत संभाषण करता करता नाडीचे ठोके कसे मोजायचे हे सारे हिप्पोक्रॅटीस तपशीलवार सांगतात.
मनाचे हे परिमाण इसवी सनाच्या नवव्या-दहाव्या शतकापर्यंत कायम राहिले. ज्या वैद्यक व्यवस्था मर्यादित प्रदेशात आणि विचारांच्या देवाणघेवाणीपासून वंचित राहिल्या त्यांची वाढही खुरटली. ह्याला युरोपातील वैद्यकव्यवस्थाही अपवाद नव्हती. ही व्यवस्थाही तर्कपुष्ठ आणि हास्यास्पद उपायांनी भरलेली होती. मनाची आणि मनोविकारांची फारकत मुख्य प्रवाहापासून झाली ती ह्या काळात.
पुढे पृथ्वीचा संस्कृतिमध्यबिंदु युरोपात सरकला कारण जहाजबांधणीचे नवे तंत्र अवगत झाले आणि विज्ञान-कला ह्या साऱ्या क्षेत्रांमध्ये नवविचाराचे ‘रेनेसान्स’ वारे वहायला लागले. शरीराच्या व्याधींवर संशोधन होऊ लागले पण मनाची रवानगी मात्र साहित्य, तत्वज्ञान आणि उपासना धर्मांच्या कक्षेमध्ये करण्यात आली. ह्याच काळात मनोरुग्णांसाठी, समाजापासून बहिष्कृत करणारे Asylums म्हणजे ‘पागलखाने’ तयार झाले. त्या काळातील युरोपीयन ‘सभ्यते’मध्ये अशा विचित्र, बेंगळूर लोकांना स्थान नव्हते. पुढच्या काही शतकांमध्ये पिनेल ह्या डॉक्टरने ह्या रुग्णांच्या साखळ्या तोडल्या तेव्हा ती क्रांतीकारक घटना ठरली. मेस्मेरने त्या काळात एक उपचारपद्धती विकसित केली. तिचे नाव ‘मेस्मेरिझम’. पुढे युरोपीयन आधुनिकतेचे केंद्र इटलीतून ऑस्ट्रियामधल्या व्हिएन्ना ह्या शहरात आले. मानसशास्त्राच्या इतिहासातला क्रांतीकारक क्षण येण्यासाठी एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत वाट पहायला लागणार होती.
डॉ. सिगमंड फ्रॉईड हा खरे तर न्युरोलॉजिस्ट डॉक्टर. त्याच्या अनुभवामध्ये असे रुग्ण आले ज्यांची लक्षणे मज्जासंस्थेच्या बिघाडासारखी ‘दिसायची”. परंतु प्रत्यक्ष तपासणीमध्ये मात्र त्यात कोणताही ‘आजार’ मिळायचा नाही. फ्रॉईडच्या काही पूर्वसूरींनी तर काही समकालीनांनी, ‘हिप्नॉटिक सजेशन्स’चा वापर केला होता. ‘Talking Cure ‘ अशा पद्धतीबद्दल प्रयोगही सुरु होते. पण फ्रॉईडचे वैशिष्टय असे की उपचारांच्या पद्धतीवर प्रयोग करताना त्याने ‘मन’ नावाच्या अमूर्त गोष्टीची, ‘रचना’ काय असावी ते प्रथमच सांगितले. जाणीव आणि नेणीव, conscious आणि unconscious हे शब्द आज आपण खूप सहजपणे वापरतो. मनाचे कप्पे असणे, त्यातील सबोध आणि अबोध अशा कप्प्यांमध्ये अर्धपारदर्शकता असणे हे सारे प्रत्यक्ष व्यक्तींसोबत काम करताना, जणु ‘लॅब’ मध्ये पडताळले जात होते. ‘Free Association’ ह्या उपचार पद्धतीला जोरदार विरोध झाला. पुढच्या दहा वर्षांमध्ये फ्रॉईडला प्रतिभावान सहकारी मिळाले. त्यामध्ये कार्ल युग, अॅडलर अशा अनेकांचा समावेश होतो.
जाणीव आणि नेणीवेमधला सेतू म्हणजे स्वप्ने. ही कल्पना आणि त्यावरचे संशोधन ही त्या काळाच्या संदर्भात अफाट गोष्ट होती. फ्रॉईडचा अभ्यास रुग्णांपुरता मर्यादित नव्हता. शेक्सपीयरसारख्या नाटककारांच्या कलाकृती, तो कोळून प्यायला होता. नीत्शेसारख्या विचारवंताचा त्याने अभ्यास केला होता. सन १८९१ पासून १९३८ पर्यंत फ्रॉईडच्या निवासाची आणि क्लिनीकची जागा स्थिर राहिली. काही वर्षांपूर्वी ही जागा व आता तिथले म्युझीयम पहाण्याची संधी मला मिळाली. पहिल्या मजल्यावर नेणाऱ्या त्या प्राचीन, प्रशस्त जिन्यावर किती प्रतिभावान संशोधकांचे पाय पडले असतील. फ्रॉईडच्या क्लिनीकच्या ‘वेटींग रूम’ मध्ये समविचारी संशोधकांच्या बैठका होत. दर बुधवारी होणाऱ्या ह्या विचारमंथनाला पुढे संस्थारूप आले. ही खोली अगदी जशीच्या तशी जपून ठेवली आहे. मनाच्या विकासातले टप्पे तसेच, मनातील लैमिकतेचे अबोध मनावरील ठसे ह्या संदर्भात फ्रॉईडने नव्या कल्पना मांडल्या. मनाच्या रचनेमध्ये, आदीम इच्छांचे प्रेरणास्थान असलेला ‘Id’, वास्तवातील जगाशी जोडणारा ‘Ego’ आणि ह्यावर कडक देखरेख करणाऱ्या नैतिकतेचा ‘Superego’ ही मांडणी आज ऐकायला सोपी वाटते कारण ती वर्षानुवर्षे वापरल्यामुळे सोपी ‘वाटते’ इतकेच.
फ्रॉईडने मांडलेल्या प्रत्येक संकल्पनेवर मतभिन्नता झाली, विवाद झाले. पण ह्या साऱ्यामधून एक महत्वाचे योगदान मिळाले. ‘मन’ पुनश्च वैद्यक विज्ञानाच्या परीघामध्ये प्रवेश करते झाले. निव्वळ ह्या एका सहभागासाठी आपण आज फ्रॉईडचे ऋण मानायला हवेत. विसाव्या शतकाच्या सुरवातीला रशियामध्ये सुरवात झाली ती मानवी ‘वर्तना’च्या अभ्यासाला. एकीकडे फ्रॉईड जाणीवांचा अभ्यास करत होता तर पाव्हलॉव्ह सारखे शास्त्रज्ञ प्रयोग रचत होते वर्तनाच्या सवयी कशा निर्माण होतील त्या ‘Conditioning of Behavior’ वर. हंगेरीमधल्या व्हॉन मेड्यून्त ह्या डॉक्टरच्या असे लक्षात आले की, जर सायकॉसीस म्हणजे मनोक्षुब्धतेच्या तीव्र झटक्यातून जाणाऱ्या रुग्णाला आकडी अथवा फिट आली तर त्याच्या मनोविकाराची लक्षणे कमी होतात. त्यातून जन्म झाला ‘Convulsive Therapy’ अर्थात मनोविकारांवरच्या ‘शॉक थेरपी’चा. पुढे सरलेट्टी व बिन्नी ह्या इटालीयन शास्त्रज्ञांनी त्यासाठी ‘विद्युत शक्ती’चा वापर केला. अशाप्रकारे मानसिक आजारांवरची ‘विद्युत उपचार पध्दती’ अस्तित्वात आली.
पहिले महायुद्ध ते दुसरे महायुद्ध ह्या कालखंडामध्ये फ्रॉईडने विकसित केलेली ‘सायको अनॅलीसीस’ ही उपचारपद्धती अमेरिकेमध्ये पोहोचली होती आणि लोकप्रियसुद्धा झाली होती. दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजू लागले. पहिल्या महायुद्धानंतर मानसिक विकलांगता आलेल्या हजारो सैनिकांचे निदान केले गेले होते ‘Shell Shock’ अर्थात युद्धकाळातील अशक्य तणावामुळे आलेली मनाची सुन्नावस्था. पुन्हा असे युद्ध झाले तर ही अडचण सोडवायची कशी असा मोठा प्रश्न होता. युध्दे सुरु होतात राजकारण आणि सत्तेचा संघर्ष अशा घटकांमुळे पण भरडून निघते सामान्य जनांचे आयुष्य . . . तरीही, शास्त्राच्या दृष्टीने ह्या कलहकाळातही काही विकासाच्या संधी दडलेल्या असतात. ह्या थरारक इतिहासावर एक नजर फिरवू पुढच्या लेखांकामध्ये.

आय.पी.एच.पुणेसाठी भावी स्वयंसेवक

आय.पी.एच. अर्थात इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेचे काम आता पुणे शहरात सुद्धा सुरू झाले आहे.

आपल्या सर्वांच्या मनामध्ये दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. परंतु कधीकधी आपल्याला दिशा मिळत नसते. एखाद्या विषयात रस असतो पण त्या कामाचे आणि आपल्या वेळाचे गणित नीटपणे बसत नाही. कधीकधी आपण सातत्य आणि चिकाटीमध्ये कमी पडतो. मधूनच उद्भवणाऱ्या वैयक्तिक, कौटुंबिक अडचणी तर असतातच.

म्हणजे स्वयंसेवकाच्या वृत्तीला योग्य वळण कसे द्यायचे हा आपल्यापुढचा प्रश्न असतो. लोकांना / संस्थेला मदत करताना स्वतःचा भावनिक लाभ जरूर डोळ्यापुढे ठेवावा. ह्या कामातून मी अधिक चांगला माणूस बनणार आहे ना, असे स्वतःला सांगावे … म्हणजे ‘स्वयंसेवा’ म्हणजे ‘परोपकार’ नव्हे हे आपल्या ध्यानात राहील.

मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करताना स्वयंसेवकांना सामना करावा लागतो समाजातील, मानसिक आरोग्यविषयक गैरसमजांचा. परंतु ह्या क्षेत्रातले कार्यरत स्वयंसेवक हाच मानसिक आरोग्याच्या कलंकमुक्तीचा (Destigmatization ) सज्जड पुरावा असतो.

आय.पी.एच.मध्ये स्वयंसेवकांचे प्रशिक्षण आणि सहभाग ह्याला आपण अतिशय महत्त्वपूर्ण स्थान देतो. म्हणूनच आय.पी.एच.चे स्वयंसेवकत्व ही एक विचारपूर्वक घेण्याची जबाबदारी आहे तसेच त्यामध्ये स्वयंविकास, सामाजिक बांधिलकी आणि ‘देण्याचा आनंद’ असे अनेक महत्त्वाचे पैलू आहेत.

स्वयंसेवकांनी भरून देण्यासाठी एक माहितीचा फॉर्म तयार केला असून त्यासाठी office@iphpune.org येथे अथवा 25474705 / 06 या क्रमांकावर श्री प्रदीप कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.

मनआरोग्य क्षेत्रातील प्रभावी युती : ठाणे आणि पुणे

संस्था उभारणीच्या कामाला लागून बत्तीस वर्षांचा काळ लोटला ह्याची नव्याने जाणीव होते आहे … मनोविकार शास्त्रामध्ये एम.डी.ची पदवी मिळाल्यानंतर दोन वर्षे मुंबईच्या केईएम रुग्णालयात पूर्णवेळ लेक्चरर म्हणून काम केले. त्या काळात गर्दच्या उपचारासंदर्भात जनजागृती केली, गटउपचार घेतले, पोलिसांसोबत काम केले, शिबिरे घेतली … काम करणारा मी एकांडा होतो तरी  केईएमच्या यंत्रणेचा आणि नावाचा भक्कम पाठिंबा होता. म्हणूनच मी  केईएम सोडू नये असा माझ्या एका सरांचा सल्ला होता. पण आमच्याच क्षेत्रातले माझे दुसरे गुरू मात्र म्हणाले की ह्या कुंपणात राहू नकोस. तुझ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी स्वतःच उचल.

त्यांचे ऐकून बाहेर पडलो. एव्हाना पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना अनिल- सुनंदा अवचटांच्या पुढाकाराने आणि पु. ल., सुनीताबाईंच्या मदतीने झाली होती. २९ ऑगस्ट  १९८६ च्या सकाळी, बाबा आमटेंच्या आशीर्वादाने मुक्तांगणचे उदघाटन झाले तेव्हा त्या समारंभाचे सूत्रसंचालन मीच करत होतो. म्हणजे माझ्या संस्थारूप कामाचा श्रीगणेशा झाला तो खरेतर पुण्यामध्ये.

मुक्तांगणमधून बाहेर पडणाऱ्या रूग्णांसाठी ठाण्यामध्ये डे-केअर सेंटर सुरू केले ते १९८७ मध्ये. डॉ. श्याम आणि सुनीती कणबूरांनी त्यांच्या रुग्णालयाची जागा निःशुल्क दिली म्हणून. हे केंद्र बऱ्यापैकी गजबजू लागले. ग्रीटिंग्स कार्ड्स, आकाशकंदील, ख्रिसमस ट्रीज तयार करण्याचा वर्कशॉप सुरू झाला. १९८९ साली व्यसनातून बाहेर पडणाऱ्या तरूण मित्रांना सोबत घेऊन एक जनजागरण कार्यक्रम केला ‘ड्रग फाईट – एटीनाईन’. सारी शाळा कॉलेजेस ढवळून काढली परिसरामधली …  आता कुमारवयीन मुले आणि त्यांचे पालक यायला लागले सल्ल्यासाठी. त्यातून ‘ टफ टीन क्लब’च्या बैठकी सुरू झाल्या. ‘ युथ क्लब ‘चे ट्रेक निघू लागले. आणि १९९० साली मी फाईलमधून बाहेर काढली १९८२ साली लिहिलेली एक योजना … समाज आणि मनआरोग्य ह्यातील दरी सांधणारी, ज्ञान आणि विज्ञानाचे पूल बांधणारी एक संस्थारूपी चळवळ सुरू करायची आहे. आय.पी.एच. …. इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ!

आता मदतीला मंडळी होती. ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ. शुभा थत्ते होत्या. उत्साही पेशंट्स होते. युथक्लबचे तरूणतरूणी होत्या. ठाण्याच्या कारखानीस हॉस्पिटलच्या डॉक्टर मॅडमनी तीन रिकाम्या खोल्या दिल्या. दोन वर्षे निःशुल्क वापरण्यासाठी. गडकरी रंगायतनमध्ये नाटकाचा प्रयोग लावला. तिकीट विक्री केली. स्मरणिका काढली. आणि आमचे पहिले आर्थिक बळ उभे झाले ते तब्बल सत्तर हजाराचे. तिकीट खपवण्यासाठी, जाहिराती मिळवण्यासाठी रिक्शा- स्कुटर – पायी अशी केलेली तंगडतोड अजूनही त्या त्या रस्त्यांवरून जाताना आठवते.

२३ मार्च १९९०ला आय.पी.एच. केंद्र सुरू झाले आणि संस्थेद्वारे मनआरोग्यातले विविध उपक्रम करण्याचा धडाका आम्ही सुरू केला. स्किझोफ्रेनिया, एपिलेप्सी ह्या आजारांवरच्या लोकपरिषदा असोत की विचारी पालकत्वावरचे नियमित व्यासपीठ ‘मंथन’. मुलांची शिबिरे तर सुरूच होती. मनोविकारावर सर्वंकष सेवा, मानसिक विसंवादावर समुपदेशन आणि मानसिक विकासासाठी प्रत्येक वयोगटासाठी उपक्रम….

मानसशास्त्रीय चाचण्या, बालकपालक मार्गदर्शन, कुमारवयीन मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन अशा त्यावेळी काळाच्या पुढे वाटणाऱ्या अनेक सेवा धारीष्ट्याने सुरू केल्या. संस्था सुरू झाल्यापासून तीन वर्षातच एका मोठ्या आर्थिक आरिष्टाला तोंड देत पुन्हा सावरलो. भाड्याच्या एका जागेतून दुसऱ्या जागेत जात राहिलो …. तक्रार न करता काम करत गेलो. त्यातून समाजाचा विश्वास मिळवत गेलो. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी ठाणे शहरात स्वतःची जागा घेण्याच्या इराद्याने प्रयत्न सुरू केले. पुन्हा एकदा निधी जमवण्यासाठी धावपळ. अकरा वर्षांपूर्वी पाडव्याच्या दिवशी आमच्या ६५०० स्क्वेअर फूटाच्या, तीन मजल्याच्या जागेत आम्ही आलो.

असे वाटले की आता ही जागा प्रशस्त आहे. पुढे काही करायला नको. पण गेल्या दशकामध्ये उपक्रम आणि प्रकल्प वाढले. ‘आकलन’ हा आमचा व्यावसायिकांचे प्रशिक्षण करणारा विभाग, ‘आवाहन’ हा माध्यम विभाग, ‘इलिगन्स’ हा कॉर्पोरेट प्रशिक्षण विभाग, ‘त्रिदल’ हे स्किझोफ्रेनीयाच्या रूग्णांचे पुनर्वसन केंद्र … तऱ्हतऱ्हेचे स्वमदत गट, शिक्षक – पालकांसाठीचे उपक्रम ….एकाचवेळी १३८ verticals वर इथून काम सुरू असते. आज आम्ही ७२ मानसिक आरोग्य व्यावसायिक, ४८ पूर्णवेळ मदतनीस, १०० च्यावर प्रशिक्षित कार्यकर्ते असा सव्वा दोनशेचा परिवार झालाय हा.

२०१७ साली हा पसारा अजूनच वाढला. ठाण्याच्या मनोरुग्णालयाच्या मालकीचा पण त्या आवारापासून जरा दूर असलेला एक प्रशस्त परिसर वापरण्यासाठी  आय.पी.एच. आणि राज्य सरकारचा सार्वजनिक आरोग्य विभाग ह्यांचेमध्ये समन्वयपत्र तयार झाले. स्किझोफ्रेनीयाचे रूग्ण आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांच्या त्रिदल कार्यशाळेसाठी प्रशस्त इमारत मिळाली. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे दिनसुविधा केंद्र सुरू झाले. मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी नियमित प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. जिल्हा परिषदेचे शिक्षक, स्पेशल मुलांचे पालक या ह्यांच्याबरोबरचे प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. हे सारे उपक्रम पूर्णपणे विनामूल्य आहेत. ह्या परिसराचे नाव आहे ‘ सप्तसोपान’, तिथे दिडशे लोक बसू शकतील असे खुले व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांमधले रोलमॉडेल्स सादर करण्याचा मासिक कट्टा सुरू झाला आहे. दर महिन्याला ‘मनतरंग’ हा फिल्म क्लब सुरू झाला आहे. ह्या परिसराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आय.पी.एच.ची वीस आसनी बसही निःशुल्क सेवा देऊ लागली आहे.

दरम्यान, मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी म्हणून येऊ लागले. यंदाच्या वर्षी तर सुमारे दोनशे दिवस विविध प्रशिक्षणक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. आय.पी.एच.पासून पाच मिनिटांच्या अंतरावर एका स्वयंपूर्ण बंगल्याचे नूतनीकरण करून तेथून सुरू झाले आहे ‘मैत्रघर’ हे अतिथीगृह. आठ ते नऊ व्यक्तींसाठी रहाण्याची घरगुती आणि आरामदायक सोय.

सुमारे पाच महिन्यांपूर्वी हे सारे प्रकल्प पूर्ण होताना वाटत होते की आता खूप झालं … थांबावं आता !

संध्याकाळी घरी गप्पा मारताना माझी मानसकन्या, सायकिअॅट्रीस्ट डॉ. सुखदा म्हणाली, “तुझ्या लक्षात आले का बाबा … गेल्या महिन्यात मी रांगेने अकरा दिवस पुण्यात कार्यक्रम घेत होते.” मी म्हणालो, ” खरंच की !” माझे आणि आय.पी.एच.मधल्या सर्व सहकाऱ्यांचे पुण्यामधले भाषणाचे कार्यक्रम, कार्यशाळा, शिबीरे तुडुंब भरतात … शेवटी एकच प्रश्न,” पुण्यात का नाही  आय.पी.एच. सुरू करत ?”  आय.पी.एच.च्या केंद्रामध्ये सकाळी दहा ते रात्री नऊ ह्या वेळात सरासरी १३० कुटुंबे आरोग्यसेवा घेण्यासाठी येतात. त्यात रोज पुण्याहून येणारी कुटुंबे असतात सरासरी ८ ते १०. आज पुणे परिसरातील सुमारे १२०० कुटुंबे ठाण्याच्या फॉलोअपवर आहेत.

त्यात भर पडली ती पुणे वेधच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाची. १९९१ साली ठाण्यामध्ये सुरु केलेली वेध व्यवसाय परिषद आता ठाण्यासह एकूण अकरा शहरांमध्ये भरते. यंदा पुण्यातले तिचे आठवे वर्ष. ज्येष्ठ शिक्षक दीपक पळशीकर सर आहेत ह्या गटाचे संघटक. शिवाय मुक्तांगणचा सारा परिवार आहेच की …. का नको सुरू करूया आय.पी.एच. पुण्यामध्ये ? …

“तू पुण्याला शिफ्ट होऊन जबाबदारी घेणार तर करू आपण सुरु ” मी सुखदाला म्हणालो. तिने होकार दिला. आणि सुरुवात झाली आणखी एका बाळंतपणाची. हो… बाळंतपणच ते! विचार आणि कल्पना रूजण्यापासून ते संस्थेचा दिनक्रम सुरू होण्यापर्यंतचा काळ सारा प्रेग्नन्सीचा … विनोदाचा भाग सोडून देऊ पण पुण्यामध्ये एक कोअर ग्रुप तयार केला. त्यात विविध वयोगटातील आणि व्यवसायातील लोक एकत्र आले. डॉ. मोहन आगाशे, अनिल अवचट (माझा बाबा), डॉ. विकास नाडकर्णी (माझा दादा) ह्यांच्या अध्यक्षतेखाली सारा गट काम करू लागला. कर्वेनगर भागामधला एक बंगला भाडेतत्वावर नक्की केला. त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले. पुण्यातल्या हितचिंतकांची एक बैठक घेतली ३० जानेवारीला. त्याला शंभरावर मंडळी आली. लहानमोठ्या देणग्यांचा ओघ सुरू झाला. वेगवेगळ्या कंपन्यांच्या, सामाजिक बांधिलकी ​विभागांकडे योजना सादर केल्या चर्चा झाल्या. ह्या प्रयत्नांनाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पुण्याच्या केंद्रामध्ये ठाण्यात मिळणाऱ्या सेवा तर मिळतीलच. त्याशिवाय इथे आरोग्य क्षेत्रातील स्वसहाय्य गटांचे एक Hub, केंद्रस्थान निर्माण करण्याचा संकल्प सोडला आहे. त्याच पद्धतीने मानसशास्त्र, मनोविकारशास्त्र, समुपदेशन  ह्या साऱ्या क्षेत्रातील पदवीपूर्व, पदव्युत्तर विदयार्थी तसेच प्रॅक्टिस करणारे मानसशास्त्रज्ञ ह्यांच्यासाठी विनामूल्य शैक्षणिक अभ्यासगट घेण्याची योजना मी तयार केली आहे. पदवीपूर्व विदयार्थ्यांच्या ह्या अभ्यासगटाचे नाव असेल ‘अवांतर’ …. मास्टर्सच्या विदयार्थ्यांसाठी ‘समांतर’…… आणि प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी ‘निरंतर’. हे मासिक अभ्यासगट यंदा जुलै महिन्यापासून सुरु होतील. ठाणे आय.पी.एच्.च्या शिक्षक गुणसंवर्धन प्रकल्पामध्ये पुण्याच्या काही शाळा आधीपासून सहभागी आहेत. त्यामध्येही आता भर पडेल. खेळाडूंचे मनोबल वाढवणाऱ्या आमच्या ‘मिशन एक्सलन्स’ ह्या विभागाचे कामही आता पुण्याहून सुरु होईल.

पुणे परिसरातील आय.बी.एम्., भारत फोर्ज, सिमेन्स अशा कंपन्यांसोबत आय.पी.एच्. कार्यरत आहे. त्यामध्ये आता बजाज फिनसर्व्ह, पर्सिस्टंट अशा कंपन्यांच्या सहभागाची भर पडणार आहे. आर अँड डी पॉलीप्रॉडक्ट्स, मोरडे फूड प्रॉडक्ट्स, प्राज इंडस्ट्रीज ह्या कंपन्यांनी ह्या निमित्ताने  आय.पी.एच्.च्या कार्याला आर्थिक पाठिंबा दिला.

मार्च महिन्याच्या चोवीस तारखेला आय.पी.एच्. पुणे कार्याला सुरुवात करेल. २३ मार्च हा ठाण्याचा स्थापना दिन. त्या दिवशी ठाण्याची टीम पुण्याच्या टीमला, ‘ शुभास्ते पंथानः सन्तु’ म्हणणार आहे. पुण्यात आपले काम सुरु करावे ही कल्पना आणि ती प्रत्यक्षात येण्याचा दिवस ह्यात पाच महिन्यांचे अंतर आहे….. तरीही ती Full Term Normal Delivery असणार…. कशातून वाटतो आहे मला हा कॉन्फीडन्स ?

बत्तीस वर्षांपूर्वी मी एक व्यक्ती होतो…. एकटी व्यक्ती होतो….. .  मानसिक आरोग्य क्षेत्राचे नवे आयाम, नव्या दिशा शोधायच्या आहेत असा ध्यास मात्र त्यावेळीही आजच्या इतकाच उत्कट होता…..त्यात मला मिळू शकणाऱ्या मान्यता, प्रसिद्धीपेक्षाही, माझ्या ज्ञानशाखेचे महत्व समाजात रुजावे हा ध्यास होता. आज आम्ही एलीट कमांडो फोर्सेसपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंपर्यंत आणि तरुण उद्योजकांपासून ते उभरत्या गायकांपर्यंतच्या अनेक गटांबरोबर काम करतोय्  ….. And our inputs are making a difference. आज माझ्या ज्ञानशाखेबद्दलची जाण समाजात अधिक विकसित झली आहे म्हणून आज असा प्रतिसाद मिळतो आहे. ह्या संस्थेच्या निमित्ताने ज्या शेकडो व्यावसायिकांनी, स्वयंसेवकांनी, कार्यकर्त्यांनी हातभार लावला आहे आणि लावत आहेत त्या साऱ्यांमुळे आज ही व्यक्तीपलीकडे जाणारी, समाजाची चळवळ होऊ पहात आहे.

आजचा काळही संक्रमणाचा आहे. मनआरोग्यक्षेत्रासाठी नव्या आव्हानांमध्ये नव्या संधी शोधण्याचा आहे. अशावेळी  आय्.पी.एच्.सारखी संस्था तीन दशकांनंतरही नव्या दमाने, नव्या उभारीने आपले काम विस्तारात आहे ही गोष्ट महत्वाची.

आय्.पी.एच्.ला वीस वर्षे झाली तेंव्हा प्रसिद्ध झालेल्या.’शहाण्यांचा सायकिअॅट्रीस्ट’ ह्या पुस्तकामध्ये मी लिहिले होते की आय्.पी.एच्. च्या शाखा काढण्यामध्ये मला रस नाही. दहा वर्षानंतर माझे मत असे बनले आहे की आय्.पी.एच्. चा आकृतिबंध, पुनरावृत्त व्हायला हवा ….. Replicate व्हायला हवा. तरच त्याला शास्त्रीय आकृतिबंध मानता येईल. आणि त्यासाठी नव्या पिढीच्या हातामध्ये  लगाम देणेही आवश्यक आहेच की. त्यांच्यामागे आपली शक्ती उभी करणेही महत्वाचे. ठाण्याच्या आय्.पी.एच्.मध्येही पुढच्या तीन वर्षांमध्ये नवी नेतृत्वफळी तयार करण्याची ‘IPH GenNEXT’ ही योजनाही सुरु होत आहे…. थोडक्यात काय तर बत्तीस वर्षांनंतरही मी आज मस्त मजेत आणि प्रचंड बिझी आहे. वैयक्तिकपणे रूग्ण पाहण्यामधला माझा वेळ मला मर्यादित करावा लागला आहे. पण गुणी सहकारी ती गरज पूर्ण करू लागले आहेत. आणि आता माझी शक्ती सहकाऱ्यांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी वापरणे गरजेचे झाले आहे.

तर बत्तीसवर्षाच्या काळात खूप चढउतार पाहिले पण दिशा राहिली ती उन्नती आणि प्रगतीची. विनोबांचे असे उद्धृधृत आहे कि आज मनोविकारांच्या विरोधात ब्रह्मविद्येबरोबरच विज्ञानही उभे राहणार आहे… वीस वर्षांपूर्वी वाचले, तेंव्हापासून विनोबांचा आशीर्वाद म्हणून हे विधान मनात धारण केले आहे… आय्.पी.एच्. संस्था सुरु झाली तेंव्हा अचानकपणे संस्थेचे बोधवाक्य सुचले होते….Mental Health for All…. सुदृढ मन सर्वांसाठी ! आजही हे वाक्य तितकेच अनुरूप आहे…… ऊर्जा मात्र अनेकांच्या सहभागामुळे अधिक तेजाळलेली आहे.

World Mental Health Week Special Series (Part 4)

मन–विज्ञान : काल, आज आणि उद्या मनोविकारांच्या …

World Mental Health Week Special Series (Part 3)

मन–विज्ञान : काल, आज आणि उद्या वर्तमानकाळातल्या …

World Mental Health Week Special Series (Part 2)

मन–विज्ञान : काल, आज आणि उद्या पहिले महायुद्ध …