Call 954 524 6222 / 954 528 6222

वेध … अनुभव… प्रवास… ध्यास… कर्तव्य

वेध … अनुभव… प्रवास… ध्यास… कर्तव्य

श्रीमती सुनंदा अमरापूरकर

           मला आठवतं ते साल असेल बहुतेक १९९५. माझी थोरली मुलगी सायली आय पी एच मध्ये नुकतीच काम करु लागली होती आणि धाकटी रीमा दहावीला बसली होती. आनंदाचा आणि आय पी एच चा – खरंतर या दोन्ही अत्यंत एक रूप झालेल्या अशा संस्था आहेत… हो …आनंद सुद्धा स्वतः मधेच आहे… कित्ती त्याच्यातले व्हर्टीकल्स आणि किती ते काम … नुसतं ऐकून दमायला होत… आणि तो प्रत्यक्ष सगळं करतो… तर त्यातलाच एक व्हर्टिकल म्हणजे वेध. १९९५ मध्ये रीमा ला एक दिशा मिळावी म्हणून सायली ने त्या वर्षीच्या ऑडिओ टेप आणलया होत्या घरी. आम्ही सगळ्यांनी त्या एकत्र बसून ऐकल्या.

            त्या नंतर आमाच्या घरी हि प्रथाच पडली. टेप आणायच्या आणि ऐकायच्या. प्रवासाला निघालं कि तर वेध च्या टेप्स गाडीत बरोबर घेतलेल्या असायच्याच. मी दार वर्षी वेध ला संध्याकाळी तरी हजेरी लावायचे, पण सदाशिवला मात्र त्याच्या कामाच्या व्यस्ततेमुळे कधीच जमलं नाही. पण त्याच्या डोक्यात वेध फिरत मात्र असायचा. एखाद्या वेगळ्या आणि चांगल काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल कळलं कि आवर्जून आनंदाला त्याची माहिती द्यायाची असा नेमच त्यांनी धरला होता. पुढे मला आठवतंय एखाद्या वर्षी माझ्या मधल्या मुलीने – केतकीने वेध च्या व्हिडीओग्राफी ची पण जबाबदारी पार पाडली होती.

        इथे मी नुसती वेध म्हणतीये  कारण तेव्हा वेध फक्त ठाण्यात होत होता. आमचं कुटुंब  कोणत्या न कोणत्या पद्धतीने वेध मध्ये पूर्णपणे रंगलं होतं. सदाशिव ला तर वारंवार वाटायचे हे विचार माझे करीअर घडवताना मला मिळाले असते, तर मी अजून खूप वेगळा घडलो असतो …. पण मोठं मोठ्या व्यक्तींचे विचार आम्ही आमच्या मुलींपर्यंत पोहोचवू शकतो, हि भावना खूप सुखावून जात होती… हे विचार अधिक अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत असे वाटत होते. विशेषतः आम्ही ज्या गावी वाढलो, तिथल्या मुलांना हे मिळाले तर खरंच खूप चांगले होईल असं आम्हाला वाटत होतं.

          साल होतं २००४. आमच्या शाळेतल्या वर्गमित्राचं रियुनिअन होत. तिथे सदाशिवने हा विचार बोलून दाखवला. आपण आपल्या गावाच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायला हवं. त्याच्या डोक्यात जे फिरत होते ते त्याने बोलून दाखवलं. नगरला वेध करायचा… आमच्या वर्गमित्राने लगोलगो मान्यता दिली. मग आम्ही आनंदाशी बोललो आणि आनंद हि तयार झाला.

          सदाशिव झपाटल्यासारखा कामाला लागला. स्पॉन्सर शोधणे, त्याला पटवणे, गेस्ट आणणे, सगळं काही घराचं कार्य असल्यासारखं आम्ही करत होतो. २००५ साली नगर मध्ये पहिला वेध झाला. ठाण्याच्या बाहेर तो पहिला वेध. झालं. आमच्या घरातला तो एक वार्षिक उपक्रमाचं झाला. वर्षभर त्यासाठी बौद्धिक पातळीवर  कार्यरत राहावे लागे. नगर ला फेरी झाली कि वेध ची एक मीटिंग व्हायचीच… किंबहुना बहुधा वेध साठीच नगर ची फेरी व्हायची. हळू हळू रीमा सुद्धा वेध मध्ये पूर्णपणे सक्रिय झाली. किंबहुना २०१२ पासून गेस्ट आणायची जबाबदारी तिने पूर्णपणे स्वीकारली. हळू हळू नगर मधले इतर समविचारीही यामध्ये सामील होऊ लागले. भारत जाधव पासून नागराज मंजुळेपर्यंत, आणि डॉ. अभय बंगापासून ते चेतना गाळ सिन्हा, असे अनेक मान्यवर वेध ला लाभले. ८ वर्ष नगर वेध अशा रीतीने चाललं… या काळात महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी वेध सुरु झाले आणि बहरले… आम्हाला सगळ्यानाच याचा आनंद होता, कारण जितक्या जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल, तितकेच सुजाण आणि विचार करणारे नागरिक तयार होतील.

२०१४ सालचा वेध सदाशिव विना करावा लागला. तो गेला आणि महिन्याभरातच नगर चा वेध होता. त्याला त्या मंचावरून आदरांजली वाहण्याची वेळ माझ्यावर आली… बट शो मस्ट गो ऑन!!!! आणि आनंद सारखा भक्कम आधार असल्याने त्यातूनही पार झाले.

२०१५ साली रामाच्या बाळंतपणामुळे, नगर वेध होऊ शकला नाही. २०१६ पासून आम्ही मात्र पुन्हा कार्यरत झालो. पण सदाशिव गेल्यानंतर आमच्या मित्रमंडळींचा उत्साह बराचसा कमी झाला, असं आमच्या लक्षात आलं . म्हणून मागच्या वर्षीपासून स्व. सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्ट तर्फे सदाशिवाच्या स्मरणार्थ वेध करायचा असं आम्ही ठरवलं.

मागच्या वर्षीपासून नगर वेध ची परत सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही… म्हणूनच २०१८ सालाची नगर वेध ची थीम होती “बॅक तो बेसिक". आता नगर च्या वेध टीम मध्ये नवीन पिढीचे कार्यकर्ते सामील झाले आहेत, ज्यांनी विद्यार्थी वेध अनुभवाला आहे. नव्या पद्धतीने नव्या उमेदीने नवी टेकनॉलॉजि वापरून या वर्षीपासून वेध सुरु होणार आहे. आमच्या तिन्ही मुली यामध्ये पूर्णपणे सहभागी आहे. आमचे विचार आणि कार्य आता पुढची पिढी आता पुढे नेणार याचा आनंद काही औरच. त्यातलं महत्वाचं म्हणजे विवेकी विचाराचा प्रसार सुरु राहील.

नगर वेध चे यश हे यात आहे, कि वेध ठाण्याबाहेर  जाऊ लागला… यंदा नगर वेध मध्ये विद्यार्थी म्हणून सहभागी असलेले  नचिकेत कुंतला, नाशिक वेध मध्ये फ्याकल्टी म्हणून निमंत्रित होते. नगर वेध मध्ये विद्यार्थी म्हणून सहभागी असलेले असंख्य तरुण मित्रमैत्रिणी भेटतात… नगर वेध च्या अनुभवाबद्दल बोलतात. ज्या हेतूने वेध सुरु केला, तो कुठेतरी साध्य होतोय असं वाटत असतानाच जबाबदारी वाढल्याचीही जाणीव वाढते… आणि नांगराच्या विद्यार्थ्यांसाठी वेध ,हे आता आमच्या कुटुंबाचं कर्तव्य झाल्याचं जाणवत… नो एक्सक्यूझेस…

हे सगळं जेव्हा मी मुलींशी बोलत होते, तेव्हाच यंदाच्या थीम चा विचार मनात आला आणि तो पक्का झाला… यंदाची थीम आहे " नो एक्सक्यूझेस – नो सबबी".  कोणतीही सबब किंवा कारण न देता जे आपलं काम करत राहतात, अशा माणसांना बोलवायचं…

या वर्षीच्या फ्याकल्टी मध्ये आहेत बिजमाता राहीबाई पोपेरे, इसरो शास्त्रज्ञ प्रदीप देवकुळे, जन जागृती साठी “सोलो जर्नी" करणारी राखी कुलकर्णी, आदिवासी मुलांमधून स्मार्ट चॅम्पियन तयार करणारा माण देशी चॅम्पियन्स चा प्रभात सिन्हा आणि मराठी अभिमान गीत जग भर पोहोचवणारा संगीतकार व गायक कौशल इनामदार.

१७ नोव्हेंबर माउली संकुल सभागृह , सोवाडी, अहमदनगर येथे २०१९ चा नगर वेध होणार आहे, यंदाच्या वेध चा अनुभव हा नक्कीच सगळ्यांनी घ्यावा… नो एक्सक्यूझेस…