Call 954 524 6222 / 954 528 6222

बोलले जे ऋषी, साच भावे वर्तावया

बोलले जे ऋषी, साच भावे वर्तावया

-डॉ. आनंद नाडकर्णी

माझा जन्म झाला तो अशा कुटुंबामध्ये जिथे धार्मिक कर्मकांडांना फारसे महत्त्व नव्हते. आमच्या घरात देवाच्या तीनचार प्रतिमा लावलेल्या होत्या. त्यांना रोजचा दिवा लावण्याचे काम आई वडील करायचे. ते दोघे गुरुवारचा उपवास करायचे. त्या वारी घरी , दत्ताची आरती असे. त्यानंतर नेमाने पेढा मिळायचा. हा सारा वारसा माझ्या भावाकडे गेला. मला कधी कोणी असे कर किंवा करू नको असे सांगितले नाही. परिणामी कधी पर्यटनाच्या निमित्ताने देवळात जाण्याची वेळ आली किंवा गणपती देवीच्या उत्सवांमध्ये कुठे दर्शनाला गेलो तरच नमस्काराची कृती घडत असे. त्यामुळे प्रौढ आयुष्यामध्येही कर्मकांड, मूर्तिपूजा, उपवास, नवस या साऱ्यांपासून दूर राहिलो. हे सारे करणाऱ्यांचा दुःस्वास मात्र कधी केला नाही. अनेक तीर्थस्थळांमधला बकालपणा, विषमता अन् व्यापार पाहिल्यावर तर अजूनही विषण्णता येते आणि चिडचिडही होते

मेडिकलचा विद्यार्थी असताना, डॉ. रवीन थत्ते सरांच्या घरी ‘ज्ञानेश्वरी’वर नियमित ज्ञानसत्रे असायची. आम्ही काही मित्र तिथे हजेरी लावायचो ते नंतरच्या सुग्रास जेवणावर डोळा ठेवून. सुमारे बावीस वर्षांपूर्वी , तणाव नियोजनावरच्या प्रशिक्षण कार्यशाळा घेताना, भगवतगीतेमधील कर्मयोगावर प्रश्न विचारले जायचे. ‘मुकाट्याने आपलं कर्म करत राहायचंअसा हा दैववादी सूर नक्की नसावा असे वाटले. पण बहुतेक जण याच पद्धतीने प्रश्न विचारायचे. सत्य शोधण्यासाठी म्हणून अभ्यास सुरू केला. संस्कृतमधील भगवतगीता डोक्यावरून गेली. आणि विनोबा भेटले. गीताई, गीता वचने, गीताई चिंतानिका असे टप्पे पार करत विनोबांच्या समग्र साहित्याच्या, सहित म्हणज़े सोबत चालायला सुरवात केली. हळूहळू गाथा, दासबोध, ज्ञानेश्वरी वाचनात आली. आधुनिक  मानसशास्त्रातील Rational Emotive Behavior Therapy म्हणज़े विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती आणि भारतीय अध्यात्म ह्याची सांगड घालताना, ‘ विषादयोग,’ ‘मनोगतीआणि कर्मधर्मसंयोगअशी पुस्तके लिहिली गेली. त्यानिमित्ताने विनोबांच्या सोबतच ओशोंपासून ते विवेकानंद, महात्मा गांधी, योगी अरविंद, जे. कृष्णमूर्ती , रामकृष्ण ह्यांच्याबद्दल वाचत गेलो. महाराष्ट्राच्या भागवतधर्माचाही थोडा अभ्यास झाला

असे होता होता गाडी वेदान्त -तत्त्वज्ञानाच्या टप्प्यावर आली.निमा आणि सूर्या असे वेदान्त शिकवणारे दोन विद्वान गुरु भेटले. (www.discovervedant.com ही त्यांची साईट पहा.) म्हणजे  भारतीय परंपरेप्रमाणे  ‘गुरु भेटणेहा टप्पाही पूर्ण झाला. आपल्या भारतीय तत्वज्ञान परंपरेमध्ये दर्शनेआहेत. म्हणजेच perspectives आहेत. हिंदू, बौद्ध, जैन, शीख असे चार धर्म ह्या संस्कृतीमधून निघाले.दरम्यानच्या काळात गौतम बुद्ध आणि त्याची मांडणी ह्याची जोड REBT ला कशी देता येईल यावरही अभ्यास सुरु झाला. हे सारे अभ्यास कधीच पूर्ण होणारे नसतात

सुमारे ववर्ष सव्वावर्षापूर्वी डोक्याने असं घेतलं की वेदान्ततत्वज्ञानाची मूळ मांडणी आहे उपनिषदांमध्ये. याचा अभ्यास केला तर आजवरच्या शोधाचे खोलवरचे मूलभूत अंग कळेल आपल्याला

जे स्वतःला कळते आहे किंवा कळले आहे असे वाटते आहेते इतरांपर्यंत पोहोचवायचे हा माझ्यातल्या कार्यकर्त्यांचा किंवा ‘Activist’ चा भाग असला पाहिजे. आधुनिक मानसशास्त्राचा सांधा अध्यात्म-तत्वज्ञानाशी घातला पाहिजे हा हेतू घट्ट होण्याचे महत्त्वाचे कारण असे . . . आमच्या मनआरोग्य क्षेत्राला स्वतःचा पाश्चिमात्य चेहरा न बदलता आल्यामुळे मनआरोग्य क्षेत्राचा ‘सांस्कृतिक’ आणि सामाजिकठसा निर्माण झाला नाही. अध्यात्म क्षेत्रातील शहाण्या आणि चतुर उद्योजकांनी(हा शब्द उपरोध नव्हे तर वास्तववादी आदराने वापरला आहे.) मात्र परंपरेतल्या शहाणपणाला positive psychology ची फोडणी विनासायास देऊन स्वतःचे Branding अतिशय भक्कम केले. म्हणून मनआरोग्य क्षेत्रातल्या अभ्यासकाने ह्या शास्त्राच्या अंगाने, अध्यात्माची आणि वेदान्ताची मांडणी करायला हवी

सामाजिक वास्तवामध्ये हिंदू धर्माचे व्यापारी, असहिष्णू आणि कर्मठवादी रूप नव्याने डोळ्यासमोर येत असताना इथल्या बहुसंख्य मंडळींसमोर धर्मामधल्या शहाणपणाची (wisdom) मांडणी नव्याने करणे जरूरीचे वाटले हा दुसरा मुद्दा. अशा कट्टरवादी रूपाची भूल सुशिक्षित तरुणांना पडत आहे तेंव्हा या निमित्ताने, वेदांत विचारातली कोणती तत्वे आपण दैनंदिन जीवनात समजूनउमजून वापरू शकतो हे सांगणे गरजेचे वाटले

माझं पांडित्य सुशोभितपणे सादर करणे हा हेतू ह्या अभ्यासामागे. मी अजूनही स्वतःला अभ्यासक मानतो, ‘मुमुक्षु साधकनव्हे. ही माझी मर्यादा आहे आणि ती मी स्वीकारली आहे. ‘जिज्ञासूभक्त असल्याशिवाय तो ‘ ज्ञानी’ होणार नाही ही गीतेतीलच मांडणी आहे. तर उपनिषदांच्या या शोधामध्ये पुन्हा वेगवेगळे धर्म व्यक्ती ते नव्याने भेटले

माझ्या जगण्याचं नेमकं काय करायचं

हा एक साधा पण मूलभूत प्रश्न हळूहळू प्रकाशात आला. माझ्या जगण्यामध्ये येतात माझी उद्दिष्टे (करियर इत्यादी) माझी जीवनशैली , माझे नातेसंबंध . . . ह्या सगळ्याबरोबरच दोन प्रश्न आपल्या डोक्यात असतात . . . मृत्यू म्हणजे काय? मृत्यूनंतर काय? पुनर्जन्म असतो का

ह्या सगळ्या प्रश्नांवर वेदान्ततत्वज्ञानाची निश्चित भूमिका आहे. उपनिषदे रचणाऱ्या ऋषींनी ती नम्रपणे पण प्रचंड विश्वासाने मांडली आहे. त्यांची मांडणी समाजापर्यंत, खास करून तरुणांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे आहे.तसेच “मूर्तीमधल्या देवाचं (तिथे तो असला तर) काय करायचं?” 

“तिथे नसला तर काय करायचं?” असे प्रश्न आहेतच. “माझा देवावर तसा विश्वास नाही पण काहीतरी शक्ती आहे हे खरंअसं म्हणणारे कित्येक जण मला रोज भेटतात. पण आपल्याला ना देवाबद्दलची जण असते ना त्या ‘अद्भुत’ शक्तीबद्दल. या विषयांवरही उपनिषदांपासूनची एक मांडणी आहे. याची प्रतिबिंबे, पडसाद हजारो वर्षे पडत आले आहेत. ईशावास्त्रामधली तत्वे थेट 

शंकराचार्यांपासून, ज्ञानेश्वर, तुकाराम, परमहंस, ववेकानंद लोलोकमान्य, गांधीजी, विनोबा, ओशो, चिन्मयानंद, पांडुरंगशास्त्री, जग्गी वासुदेव, असे सारेजण त्यांच्या त्यांच्या शैलीमध्ये सांगूनही आशयाची एकात्मता कशी राखतात हे पाहिल्यावर मन थक्क होतं

वेदांत विचार आपल्याला अत्यंत रसरशीत, समृद्ध आणि व्यापक जीवन जगायला शिकवतो असे माझं मत बनलं आहे. अर्थातच असं जीवन जगण्याचा तो एकमेव रस्ता आहे असा दावा ते शहाणे ऋषी करत नाहीत. आजच्या मानसशास्त्रामध्ये ‘ positive Psychology’ अर्थात सकारात्मक मानसिकताशास्त्रनावाची शाखा रूढ होऊ पाहत आहे. आज ज्या वेगाने काळाचे आणि त्यातल्या तंत्रज्ञानवादी घटकांचे गतिमान परिवर्तन होत आहे ते लक्षात होता, परंपरेमधल्या नेमक्या कोणत्या भूमिकांच्या मुले आजचे जगणे अधिक समजूतदार आणि सहिष्णू होईल हे ठामपणे मांडणे गरजेचे वाटले.

त्यासाठी गेल्या सव्वा वर्षांमध्ये नव्याने साधन सामुग्री जमवली. वाचन सुरु केले. टिपणे काढत गेलो. डोळ्यासमोर काही, मूर्त असा पूर्वबिंदू दिसल्याशिवाय माझं मन सातत्याने काम करत नाही. Institute for Psychological Health, अर्थात आय.पी.एच. ह्या ठाण्यातल्या संस्थेला २३ मार्च २०२० ला तीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने एक ज्ञानयज्ञकरावा असा बेत केला. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मी आमच्या संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या जागेसाठी निधी उभारणी करावी म्हणून, तीन संध्याकाळी अशी नऊ तासांची सांयकाळीची संवादमालासादर केली होती. तशीच मांडणी आताही करावी असे वाटले. पॉवरपॉइंटचे सादरीकरण  करून बोलत गेलो तर कळायला सोपे जाते.

म्हणून ह्यावर्षी. १३, १४, १५, डिसेंबरच्या शुक्र, शनी, रविवारी रोज साडेतीन तास सादरीकरण करावे असे उद्दिष्ट्य ठेवले आहे.

वेदान्तविचार आणि व्यक्तित्वविकासअसे भारदस्त शीर्षक देऊन हे सादरीकरण करावे असे डोक्यात आले. पण ह्या शिर्षकामुळे तरुण वर्ग आकर्षित होणार नाही असे लक्षात आले. माझ्या जगण्याचं नेमकं काय करायचंहा प्रश्न मी सह- शीर्षकम्हणून घ्यायचं ठरवलं. ह्या सादरीकरणातून आय. पी. एच संस्थेच्या, त्रिदशकपूर्तीनिमित्त एक पायाभूत निधी उभारावा आणि तीस वर्ष पूर्ण होत आहेत तर पुढल्या वर्षभरामध्ये किमान तीस लाख रुपयांचे संकलन करावे असे योजले आहे.

अध्यात्मासाधनेतील प्रवासाला विनोबांचे नाव दिले आहे. ब्रह्मविद्याएक दिवस विज्ञान आणि ब्रह्मविद्या एका भाषेत बोलतील असा त्यांचा विचार आहे. आधुनिक मेंदूविज्ञानाने माणसाचं भावना आणि माणसाच्या Consiousness  चा विविध अवस्था ह्यावर प्रकाश टाकला आहे. ह्या संस्थेचा धागा परंपरेतल्या शहाणपणाशी जोडणे हेही मला अतिशय आश्वासक करतं. माणसाची माणुसकी जर विज्ञान आणि वेदांत एकाच पद्धतीने सांगू लागले तर ते किती मोलाचे ऐक्यअसेल. किती मोलाचे अद्वैत‘  असेल .  वेदांताची परंपरा फक्त ऐक्याची नाही तर तादाम्य अद्वैताची  आहे. दैवत म्हणजे दुभाजन … विभाजनाची सुरुवात. एकदा शिकले पडायला सुरुवात झाली कि एकता  हरवते. मानवी संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या यात्रे मध्ये एकरूप करणारेआणि फोडून तोडून विलग करणारे‘  असे  परस्पर विरोधी प्रवाह प्रत्येक काळामध्ये उपस्थित राहिले आहेत. अध्यात्मिक सहजपणा शिकण्याची धुरा संतांच्या  खांद्यावर होती आणि सामाजिक जबाबदारी त्या त्या क्षेत्रातल्या समाजससेवकांवर… कधी जि दोन्ही रूपे अनेक माहात्म्यामध्ये एकरूपही झाली… परंतु ह्यामध्ये मनमेंदू विज्ञानाला प्रत्यक्ष स्थान मिळाले नाही. आजच्या संक्रमणावस्थेमध्ये म्हणूनच ह्या अभ्यासाचे आणि सादरीकरणाचे एक दखलपात्र स्थान आहे असं म्हणावं लागले.

तू दहा-साडेदहा तास नेमकं काय बोलणार आहेस?” असा प्रश्न मला विचारलात तर त्याचे संपूर्ण उत्तर माझ्या मनात नाही. माझ्या अभ्यासात मला जरा कुठे ‘share करायलाच हवंअसे तत्त्व, तपशील, विचार मिळाला की मला तो फक्त माझ्यापुरता सीमित ठेवणे स्वाभाविक वाटत नाही … म्हणून व्यक्त व्हायचं. मन: पूर्वक मांडणी करायची धागे जोडत जायचं.

 

आम्ही वैकुंठवासी । आलो या चि कारणासी ।।

बोलिले जे ऋषी  साच भावे वर्तावाया ।।

 

असे तुकोबा म्हणतात. माझ्याकडे तुकारामांमधली कर्मयोगाची उंची आणि खोली नाही हे निखालस. पहिल्या ओळींमध्ये तुकाराम सांगतात तो आहे कर्मफळाचं आणि स्वामित्वधनाचा त्याग. परंतु दुसऱ्या ओळींमध्ये सांगितलेला हेतू मात्र माझ्या हेतूशी जुळणारा विवेक माझ्या पाठीशी आहे. हा दिलासा घेऊन, मी तुम्हा सर्वांसमोर सादर करणार आहे, तीन संध्याकाळी आणि साडेदहा तासांची हि मनउत्कर्ष संवादामाला.