‘इमोशनल सेल्फी’
– डॉ. सुखदा अभिराम
गेल्या काही वर्षात स्मार्टफोन घराघरात, प्रत्येकाच्या हाती पोचला आणि त्यासोबतच सेल्फीचं फॅडही. दिवसाच्या प्रत्येक प्रहरी, प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक वेष-केशभूषेत आणि प्रत्येकासोबत सेल्फी काढणं हे आता जवळपास अनिवार्य बनत चाललं आहे. आणि हो, तुम्ही ह्या तरुण पिढीच्या नावाने सुस्कारा सोडण्याआधी हे ही सांगते कि सेल्फीचं हे खूळ अगदी सगळ्या वयोगटात फोफावलं आहे – आई-बाबांच्या फोनवर अवलंबून असलेल्या ४ वर्षाच्या ‘बिचाऱ्या’ सान्वी पासून, सेकंड इंनिंग जोमाने खेळणाऱ्या प्रकाशराव आणि प्रतिभाआजीपर्यंत!
असं वेड ह्या सेल्फीने का बरं लावलं असेल? हातात आलेलं नवं खेळणं हे तर खरंच. पण ते आहे फक्त अभिव्यक्तीचं माध्यम. पण आपण कसे दिसतो, कसे हसतो हे आपण बघावं, नुसतं आरशात नाही तर अधिक टिकणाऱ्या अशा फोटोरूपात, आणि हे फोटो इतरांसोबत शेअर करता आले कि तर काय मज्जा! शिवाय अनेक सुंदर आठवणी आपण ह्या फोनच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करतो ते वेगळंच! दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे बिनखर्ची कारभार सगळा. मला हवी तशी मी दिसेपर्यंत वेगवेगळ्या अँगलमधून, पोज घेऊन, आणि फिल्टर्स वापरून सेल्फी क्लिक करायच्या. अशी काही झक्कास सेल्फी आली पाहिजे, की मीच माझ्या प्रेमात पडायला हवं!
मात्र ‘आधारकार्ड’ वरचा तो काहीसा कुरूप, बेढब दिसणारा माझाच फोटो बघितला की किती त्रास होतो, राग येतो मला! माझा फोटो सुंदर, मनाला भावेल असाच असायला हवा, प्रत्येक वेळी, प्रत्येक सेल्फीत, प्रत्येक फोटोत…. असा मुळी हट्टच बनून गेला आहे माझा! तसा नसेल तर तो प्रत्येक फोटो मला नाकारायचा आहे, पार डिलीट करून टाकायचा आहे!
कल्पना करा हं, आपल्याला आपली ‘इमोशनल सेल्फी’ काढता आली तर? असा कॅमेरा किंवा अँप आलं तर? काय काय दिसेल मला माझ्या ह्या इमोशनल सेल्फीमध्ये?
चेहऱ्याच्या सेल्फीत जशा सगळ्या छोट्या मोठया खुबी कैद होतात, तशाच माझ्या भावनांच्या साऱ्या छटा उमटतील माझ्या ह्या इमोशनल सेल्फी मध्ये!
आनंद, समाधान, आत्मविशास, सुख, प्रेम, भक्ती, त्याग, सहानुभूती, करुणा आणि अशा अनेक सप्तरंगी सुखावह भावना..माझ्या मनात वेळोवेळी उमटणाऱ्या. पण त्याचसोबत निराशा, वेदना, दुःख, फसवणूक, उद्विग्नता, राग, मत्सर, क्रोध, ईर्षा, स्पर्धा, द्वेष, काळजी, अस्वस्थता, कोतेपणा? ह्याही दिसतीलच की माझ्या त्या सेल्फीमध्ये! माझा वारंवार दुखावला जाणारा स्व असेल, एक खूप मोठी पोकळीही असेल कदाचित, सारं काही असून रितं रितं वाटायला लावणारी पोकळी…. आवडेल मला अशी माझी सेल्फी बघायला? कठीणच जाईल ते… नेहमी सुरेख, आनंदी आणि कोणालाही आवडेल असा चेहरा असतो माझ्या सेल्फीमध्ये, हे काय असं सगळं दिसतंय ह्या इमोशनल सेल्फीत?
पण खरंच जर नीट विचार केला, मला सांगा, ह्या साऱ्या भावना असतातच ना आपल्या मनात? जशा चांगल्या, सुखद वाटणाऱ्या भावना माझ्या आहेत तशाच ह्या त्रासदायक, नकारात्मक भावनाही माझ्याच आहेत.
ह्या अशा त्रास देणाऱ्या, नकारात्मक, छळणाऱ्या भावना म्हणजे माझ्या इमोशनल सेल्फीतला आधारकार्ड फोटोच जणू. त्यात लहानपणापासून मला साऱ्यांनी हेच शिकवलं आहे, कि रडायचं नाही, चिडायचं नाही, निराश व्हायचं नाही. अशी रडणारी, त्रास करून घेणारी माणसं म्हणजे दुबळी आणि ‘इमोशनल फूल्स!’
आपण छान दिसावं, मनात फक्त चांगल्या, सुखावह, सकारात्मक भावना याव्यात अशी इच्छा स्वाभाविक, नैसर्गिक असली, तरी तसा हट्ट कितीसा योग्य आहे? मी फक्त चांगल्या, सुंदर गोष्टींनी थोडीच बनले आहे? माझ्या इमोशनल सेल्फीत माझ्याच मनात येणाऱ्या, काहीशा गडद, अप्रिय वाटणाऱ्या ह्या भावनांचे रंग उमटणारच, तेही मला स्वीकारता यायला हवे ना? मूळात मी माणूस आहे, त्यामुळे ह्या अशा दोन्ही प्रकारच्या भावना ह्या माझ्या मनात यायच्याच! अशा भावना मनात येणे म्हणजे मी वाईट माणूस, दुर्बल माणूस नव्हे!
एक गोष्ट आहे, लहानपणी आपण सगळ्यांनी वाचलेली. एकदा एक राजा सगळ्यात सुंदर हात कोणाचे ह्याची स्पर्धा ठेवतो आणि त्या व्यक्तीला १०० मोहरांचं बक्षीस जाहीर करतो. अनेक नाजूक, सुंदर, अगदी नीट निगा राखलेले हात घेऊन लोक स्पर्धेला येतात. मात्र त्या राजाची नजर शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या हातांवर पडते. ओबड धोबड, मळलेले, राकट, घट्टे पडलेले पण धान्य पिकवणारे, ते कष्टाळू हातच राजाला सर्वात सुंदर वाटतात! त्याच धर्तीवर, मी धक्के खाल्ले, माझ्या मनात भल्या-बुऱ्या भावना असल्या – तरी खरंतर तेच माझं परिपूर्ण रूप आहे! ह्या साऱ्या भावनांसह, भल्याबुऱ्या खुबींसह, मी एक सुंदर आणि परिपूर्ण माणूस आहे!
मी माझ्या साऱ्या भावना, हव्याश्या आणि नकोश्या वाटणाऱ्याही, ओळखू शकले, वाचू शकले, तर त्या समजून घेऊ शकेन. त्या मला समजल्या आणि मी त्यांचा विनाअट स्वीकार केला तरच त्यातल्या त्रासदायाक भावनांवर काम करू शकेन. ह्या भावना नाकारणं हा उपाय नक्कीच नाही. जेव्हा जेव्हा मी माझ्यातल्या या भावना, माझा मला ना आवडणारा स्व नाकारते, माझ्या ‘माणूस’पणाला नाकारत असते.माझ्यात सकारात्मक, सहाय्यकारक बदल घडवायची संधी मी नाकारत असते. स्वतःला दोष देत, आतून कुरतडत रहाते. अधिकाधिक नकारात्मक भावनांची नको असलेली बेगमीही करत रहाते!
माझ्या आधारकार्डवरचा फोटोही मला माझा फोटो म्हणून स्वीकारता यायला हवा. वरवरच्या मेकअपने खुललेल्या चेहऱ्याइतकाच, बिना-मेकअपचा चेहराही माझाच आहे. या साऱ्या चेहऱ्यांसकट मी सुंदर आहे, माणूस आहे.
माझी इमोशनल सेल्फी मी साऱ्या रंगांसकट स्वीकारली की मग ही माझी इमोशनल सेल्फी आत बाहेर एकच असेल, सुंदर इंद्रधनुषी रंगांची!