Call 954 524 6222 / 954 528 6222

हल्लीची मुलं…

हल्लीची मुलं…

-डॉ. सुखदा अभिराम

‘हल्लीची मुलं’ असा शब्दप्रयोग आला की त्याच्या पाठोपाठ एक मोठा सुस्काराही ठरलेला! 

ह्या “हल्लीच्या मुलांबद्दल" सगळ्यांनाच खूप प्रॉब्लेम्स वाटताहेत  – आणि ह्या प्रॉब्लेम्सबद्दल साऱ्या “पूर्वीच्या पिढीचं" अगदी एकमतही आहे. 

– आळशी आहेत, धडपड करायला नको.

– सदैव गॅजेट्स आणि कन्टेन्टमध्ये बुडालेली असतात, कानात / डोळ्यासमोर सतत काहीतरी हवंच 

–  त्यांना मिळणाऱ्या कशाचीच किंमत नाही, कितीही असलं तरी त्यांचं समाधान होत नाही.  

– मोठी ध्येयं नाहीत, असली तरी त्यासाठी लागणारी चिकाटी आणि कष्टांची तयारी नाही, सोप्पं उत्तर हवं.  

– सदैव कुरकुर आणि एवढ्यातेवढ्याने त्यांना नैराश्य येतं.

ही तक्रारीची यादी खरंतर अजून कितीही वाढवता येईल.. ह्यातले काही किंबहुना बरेचसे मुद्दे आपल्याला वारंवार अनुभवायला येत आहेत. “अभ्यास करायला मला काही मोटिव्हेशनच वाटत नाही" असं म्हणणारी मिता आपल्या नात्यात आहे.  शेजारच्या आदित्यने क्रिकेट खेळायला ड्रॉप घेतला आणि आता ना अभ्यास करतोय ना गंभीरपणे खेळतोय. तेरा वर्षाची राधा ठासून सांगतेय की गाणी ऐकतच तिचा अभ्यास चांगला होतो. ‘अभ्यासात काय ठेवलंय? मला नाही तुमच्यासारखा ९ ते ६ जॉब करायचा’ असं आपणच घेतलेल्या ब्रँडेड कपड्यातला हिमांशू,लेटेस्ट मोबाइल हँडसेट बघत आपल्याला सुनावतो आहे. अशी असंख्य उदाहरणं आपल्याला पदोपदी, घरोघरी दिसताहेत. आणि अर्थातच आपण सारे मोठे , ह्या ‘हल्लीच्या मुलांच्या’ काळजीने त्रस्त आहोत. 

नक्की असं का होत असेल ह्या मुलांचं? खरंच ही  पूर्ण पिढी अशी वाया गेलेली, आळशी, ध्येयहीन आहे? खरंतर नाही, आपण सगळ्यांनाच मनोमन माहित आहे हे.  पण मग नक्की कुठे गडबड होते आहे ते मात्र उमगत नाहीये. 

आमच्या संस्थेत, IPH (Institute for Psychological Health) मध्ये भरणाऱ्या पालकशाळेत हा विषय नेहमीच अगदी ऐरणीवर असतो. पालक म्हणून आमचं नक्की काय चुकतंय, कुठे आम्ही कमी पडतोय  की ही हल्लीची मुलं अशी वागताहेत? ह्या प्रश्नाने भांबावलेले, उत्तरं शोधायला धडपडणारे अनेकजण ह्या पालकशाळेत हजेरी लावत असतात. 

तर दुसरीकडे ह्या पालकशाळांना आजकालचं फॅड म्हणणारेही काहीजण आहेत. ‘आमच्या आई वडिलांनी ४-४ मुलं मोठी केली, त्यांना कधी नाही गरज वाटली असल्या शिकवणीवर्गांची!’  किंवा ‘सगळं मिळतंय म्हणून ही नाटकं सुचतात, दोन रट्टे दिले की आप येतील वळणावर!’ असं म्हणणारेही बरेच. 

खरंच पुरेसं आहे का फक्त आपलं प्रेम आपल्या मुलांना वाढवताना? आपण मोठे होताना जे संदर्भ, जे नातेसंबंध, जो भवताल अनुभवला त्यापासून आज किती फारकत झाली आहे? मला आठवतंय, टळटळीत दुपारी दारावर येणाऱ्या पोस्टमनकाकांना, भाजीवाल्या काकांना आई “दोन मिनिट बस सावलीला" असं सांगायची, माठातलं थंडगार पाणी द्यायची. साहजिकच आस्था, मैत्र, सहानुभूती मला अनुभवायला मिळायची.  आज माझी मुलं मात्र मला असं वागताना बघतात का? उलट अनोळखी माणसांना दार उघडायचं नाही, कोणी काही विचारलं तर बोलत थांबायचं नाही, हे आणि असंच ती माझ्या वागण्यातून शिकतात, माझ्याकडून ऐकतात. आजचा काळ वेगळा आहे, धोके वेगळे आणि अधिक आहेत हे अगदी मान्य. त्यामुळे कदाचित हे चक्र उलट फिरवणं नाही शक्य व्हायचं. पण मुलांचं मूल्यशिक्षण मात्र मागच्या पिढ्यांसारखं व्हावं, त्यांना आस्था, दया, करुणा, सहानुभूती हे गुण कळावेत, त्यांनी ते अंगी बाणवावे अशी आपली अपेक्षा आहे. जी गोष्ट त्यांना आजूबाजूला, त्यांचे आदर्श असणारे पालक, शिक्षक, इतर वडीलधारे यांच्या वागण्यात दिसत नाही, ती त्यांनी कशी बरं शिकावी?शिनच्यान, नरकॉटिकस् आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’ बघत मोठ्या होणाऱ्या ह्या मुलांचे रोल मॉडेल्स, हिरो काही वेगळंच वागताहेत, सांगताहेत! आणि त्यांचा बहुतांश वेळ ह्या अशा रोलमॉडेल्स सोबत जातोय! 

आपण सगळे मोठे लोक आज अनेक प्रकारचे शिक्के ह्या मुलांवर बिनबोभाट मारतो आहोत. ज्याचा कदाचित फायदा कमी, तोटाच जास्ती आहे!

थोडंसं शास्त्रीय दृष्ट्टीकोनातून आपण मुलांची सर्वांगीण वाढ कशी होते ते समजून घेऊया. बऱ्याचदा आपण सर्वांगीण वाढ म्हणतो तेव्हा फक्त शारीरिक वाढ आणि बौद्धिक वाढ आपल्याला अभिप्रेत असते. मात्र जीवशास्त्राच्या दृष्ट्टीने सर्वांगीण वाढ म्हणजे जैविक किंवा शारीरिक, बौद्धिक, मानसिक तसंच  सामाजिक वाढ. प्रत्येकाबद्दल थोडं विस्ताराने समजून घेऊ या. 

जैविक किंवा शारीरिक वाढ म्हणजे सुदृढ शरीर. जैविक गरज म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा तर जैविक धोके म्हणजे जीवाला असणारे धोके, ‘मृत्यूचा’ धोका. 

बौद्धिक वाढ म्हणजे आकलन, विश्लेषण, तौलनिक अभ्यास, सैद्धांतिक आकलन इत्यादी. ही  बौद्धिक वाढ म्हणजेच मेंदूची पूर्ण शक्तीनिशी कार्य करण्यासाठीची वाढ, ही वयाच्या २०-२१ वर्षे वयापर्यंत होत असते.  

मानसिक वाढ किंवा भावनिक आरोग्य म्हणजे आपल्या आणि दुसऱ्यांच्या भावना आणि विचार ओळखता येणं, त्याला योग्य प्रतिसाद देता येणं, भावनांचं नियंत्रण करता येणं. ह्यालाच आपण भावनिक बुद्ध्यांक (Emotional Quotient) असंही म्हणतो. 

सामाजिक वाढ म्हणजेच समाजाचा एक भाग म्हणून वावरताना लागणारी विविध कौशल्यं , जशी की संभाषण कला, परिस्थितीशी जुळवून घेणे, गटाचा भाग बनून काम करणे, संघवृत्ती इत्यादी. 

जर आपण मानवी उत्क्रांतीचा इतिहास पहिला,आदिमानवाच्या आयुष्यात मुख्य धोका होता तो जैविक धोके अर्थातच नैसर्गिक आणि वन्य पशूंची भीती; आणि त्यातून येणारी जिवंत राहायची धडपड. बौद्धिक, भावनिक किंवा सामाजिक वाढ अतिशय मर्यादित होती, केवळ तगून राहायला आवश्यक अशीच कौशल्ये विकसित होत होती. मात्र जसजसा माणूस विचार करू लागला, त्याची शारीरिक, मानसिक आणि भावनिक गरज बदलायला लागली. त्या अनुषंगाने त्याची कौशल्य चौफेर विकास पावायला लागली. आता माणूस जंगलात शिकार किंवा कंदमुळं ह्यावर जगणारा माणूस ना राहता, प्रगत बानू लागला,शस्त्र आणि आयुधं बनवायला लागला. हळूहळू कौशल्य शिक्षण, शालेय शिक्षण ह्या विकासपूरक गरजा निर्माण झाल्या.

मात्र जैविक गरजा आणि जैविक धोके ह्याकडे बघायचा त्याचा दृष्टिकोन आणि ते हाताळण्याची त्याची आदिम प्रेरणा मात्र तीच राहिली!

आजच्या काळात, जैविक धोके फार नगण्य झाले आहेत. वाघ-सिंह यांची शिकार बनणं, अतितीव्र हवामानाने किंवा अनियंत्रित रोगराईने मृत्यू येणं अशा प्रकारे जीवाला थेट धोका, अशी आव्हानं नक्कीच कमी होत चालली आहेत, तीव्रता (इंटेंसिटी) आणि वारंवारिता (फ्रीक्वेन्सी) ह्या दोन्ही मोजमापांवर. 

मात्र इतर गरजा, सोयी-सुविधा ह्या इतक्या मूलगामी बनल्या आहेत की आपण त्यांनाच जैविक गरज मानायला लागलो आहोत. आणि त्यांचा अभाव म्हणजे आपल्यावर आलेलं जैविक संकट! 

“रोटी, कपडा, मकान आणि वाय-फाय" किंवा “घरातील सगळ्यांना एका खोलीत बोलवायचं असेल तर वाय-फाय राउटर बंद करा." हे आणि असे व्हाट्सऍपवर आलेले जोक आपण अगदी सहज फॉरवर्ड करतो, एक छोटीशी दादही देतो. पण त्याचीच दुसरी बाजूही आहे. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय घरातील मुलांनी कठीण प्रसंग, संकटं, एखाद्या गोष्टीचा अभाव, ह्या गोष्टी फारशा अनुभवलेल्याच नाहीत. अतिशय सुरक्षित आणि उबदार वातावरणात वाढलेल्या ह्या मुलांना त्यांच्या वाढीच्या ह्या टप्प्यावर “जैविक संकट" म्हणजे काय ह्याची स्पष्ट कल्पना नाही आणि अनुभवही नाही. त्यामुळे आयुष्यातल्या प्रश्नांकडे, समस्यांकडे ही मुलं थेट जैविक संकट म्हणूनच बघत आहेत. विकासपूरक (developmental need) म्हणून अंगिकारलेल्या शिक्षण, नोकरी, पैसे, प्रगती ह्यांच्याकडे, किंबहुना ह्यांच्या अभावाकडे, एक जैविक संकट म्हणूनच बघत आहेत!

ह्यात मेख अशी आहे, अनेक लाख वर्षांपासून आपल्या मेंदूला हीच सवय आहे की जीवावर प्रसंग आला की विचार करण्याचा वेग मंद करायचा आणि प्रतिक्षिप्त क्रियेने स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न करायचा. त्याला अनुसरून, एकदा मनाने कुठलीही समस्या किंवा अडचण हा अस्तित्वाचा प्रश्न किंवा जैविक संकट आहे असं मानलं की विचारशक्ती खुंटलीच समजा!

पंधराव्या वर्षी मिळालेला नकार, मार्कांची चढाओढ, इतरांच्या संपन्नतेशी सतत होणारी तुलना, मनाविरुद्ध घडणारी कुठलीही गोष्ट म्हणजे थेट  ‘जगण्या-मरण्याचा प्रश्न’ ! कुठलाही छोटा प्रश्न किंवा समस्या वास्तवापेक्षाही  मनातच अक्राळविक्राळ रूप धारण करते आणि यातून मग आत्महत्या, व्यसनं, अतितीव्र नैराश्य अश्या टोकाच्या बातम्या आपण वारंवार ऐकत असतो.

आमूलाग्र बदललेली एक अजून गोष्ट म्हणजे ह्या आपल्या मुलांना अगदी जन्मत:च मिळणाऱ्या विविध उद्दीपित करणाऱ्या संवेदना!

आपल्या आजीने बाळंतपणानंतर पुरता सव्वा महिना अंधाऱ्या बाळंतिणीच्या खोलीत काढला असेल. आपल्या आईने जरा हवा उजेड असणाऱ्या पण बंदिस्त खोलीतच आपल्याला पहिले काही आठवडे ठेवलं होतं. तेव्हा त्या बाळाला मिळणारं उद्दीपन म्हणजे आईचा स्पर्श, अगदी कमी उजेड, बाळंतिणीच्या खोलीतला खास गंध आणि बस! मात्र आज कुमारवयात असणारी मुलं किंवा मिलेनियल बेबीज? ह्या भूतलावर जन्म घेतल्यावर पहिले डोळे उघडताच हॉस्पिटल मधल्या दिव्यांचा प्रखर प्रकाश, असंख्य माणसं, त्यांचे आवाज, वास, चाहूल, अनेक यंत्रांचे आवाज.. श्रुती, दृष्ट्टी, स्पर्श, वास हि सारी ज्ञानेंद्रिये पहिल्या काही मिनिटातच उद्दीपित होतात. अवघ्या पाचव्या दिवशी कारमध्ये बसून, लिफ्टने घरी जाणं! आणि त्यानंतर तर सातत्याने नवे नवे अनुभव, चेतना, उद्दीपन ह्या मुलांना मिळत असतं . सतत ह्या माहितीच्या माऱ्याच्या कोलाहलात हि मुलं वाढत असतात, शिकत असतात. आणि आपली मात्र त्यांच्याकडून अशी सतत अपेक्षा आहे की त्यांनी शांत असावं, त्यांना नीट लक्ष एकाग्र करता यावं, तेही माझ्या एकाग्रतेच्या व्याख्येत बसेल असं! मी ज्या शिक्षांना आणि वडीलधाऱ्यांना भीत होतो, त्याच गोष्टींनी त्यांनीही घाबरावं! मला सांगा नक्की का घाबरावं त्यांनी मोठ्या लोकांना? माहिती किंवा ज्ञान मिळवायचे आज अनेक स्रोत आहेत. आणि शारीरिक माराची भीती वाटायचे दिवस तर पार इतिहासजमा आहेत आपल्यासारख्या घरातून.

सदैव गॅजेट्स आणि अफाट माहिती हाताशी असणारी ही मुलं. बालगाणी आणि नाट्यसंगीत ऐकत आपण वाढलो असू (तेही उत्तम अभिरुची जोपासणाऱ्या घरात आपण वाढलो असू तरच!) तर आजची मुलं रॉक, पॉप, बॉलीवूड, हॉलिवूड ऐकत वाढताहेत. आपल्यासाठी गल्ली क्रिकेट आणि पूर्ण कॉलनीत असणाऱ्या एकमेव टीव्हीवर मॅच किंवा रामायण -महाभारत बघणं ही मनोरंजनाची परिसीमा होती. आज अपरिमित कन्टेन्ट, वेब सिरीज आणि असंख्य इव्हेंट्स ह्यातून मुलांना त्यांच्या आवडत्या गोष्टी निवडून घ्याव्या लागत आहेत. साहजिकच त्यांना स्वतःची मतं आहेत, त्यांचा चोखंदळपणा अधिक वाढला आहे.

आणि थोडं आपण आपल्याही दुटप्पीपणाकडे बघूया की!  “स्मार्टफोन" सहजी हाताळणारा, आजी आजोबाना त्यावर सेटिंग्ज करून देणारा प्रणव, त्याचं आपल्याला खूप कौतुक वाटतं! नवी कार पूर्ण उघडून परत जोडणारी माही पुढे इंजिनियर किंवा सायंटिस्ट होणार असा कयास बांधायला किती छान वाटतं! किती हुशार आणि स्मार्ट वाटतात हि सगळी मुलं! पण ह्याच मुलांनी त्यांच्यापाशी असलेल्या माहितीमुळे किंवा कुतूहलापोटी आपल्याला प्रतिप्रश्न केला, किंवा आपण सांगितलेली गोष्ट ऐकली नाही, की ती लगेच उद्धट, उर्मट, अगाऊ, शेफ़ारलेली असतात! किती तत्परतेने आणि भरभरून अशी लेबल्स लावतो आपण आपल्याच लाडक्या माही, प्रणव, इरा आणि विहानला! " मला ना पटलेली गोष्ट सांगितली किंवा काही विचारलं तर त्यात नक्की काय चूक आहे?" हा त्यांच्या मनातला अनुत्तरित प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो. 

त्यांच्यापुढे असणारी आव्हानं वेगळी आहेत, प्रलोभनं वेगळी आहेत. त्यांचे माहिती मिळवायचे आणि ती वापरायचे मार्ग वेगळे आहेत. मात्र ह्या माहिती, तंत्रज्ञान आणि प्रगतीचा विधायक उपयोग कसा करून घ्यायचा हे शहाणपण आपणच ह्या आपल्या स्मार्ट आणि फास्ट मुलांना द्यायचं आहे. ह्याची सजग जाणीव आपण सर्वानी ठेवायला हवी.

The children are human beings of smaller size, with same brain! (Rather a smarter one!) नाही का?

If you Have Any Questions Call Us Or Whatsapp On 954-524-6222 / 954-528-6222