Call 954 524 6222 / 954 528 6222

काश्मीर

‘काश्मीर’
– डॉ. सुखदा अभिराम

पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुदलाच्या हल्ल्यानंतर देशभक्तीची एक लहरच जणू देशात उठली आहे. काश्मिरी जनता, त्यांचे प्रश्न, गेली कित्येक दशकं काश्मीरच्या खोऱ्यात सुरु असलेल्या पाकिस्तानी कुरापती, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर येतं आहे. मी मात्र त्यानिमित्ताने सुमारे वर्षभर मागे गेले, माझी सांबा भेट मला अगदी लख्ख आठवायला लागली.

जम्मू आणि काश्मीरमधील सांबा, कुलगाम, उधमपूर, कथुआ, पूंछ , राजौरी ह्या नावांचा आणि माझा संबंध ह्यापूर्वी फक्त बातम्यांमध्ये ही नावं वाचून हळहळणे इतकाच आला होता. मात्र माझ्या एका मित्राने, सारंगने, सांबाच्या आर्मी स्कुल मध्ये एक ट्रेनिंग प्रोग्रॅम करशील का विचारलं आणि मी खरंतर विचारात पडले. एकीकडे जम्मूतल्या ह्या तरुण मुलांना भेटता येईल, त्यांच्याशी गप्पा मारता येतील, झालीच तर आपली त्यांना मदत होईल हे वाटत होतं. तर दुसरीकडे सीमारेषेच्या अगदी जवळ असलेल्या ह्या सांबा गावात लष्करी कारवाया, गोळीबार, बॉम्बचे धमाके अगदी नेहमीचेच असंही कळलं होतं! पण ह्या भेटीचं, तिथल्या आर्मी कॅम्पला भेट देण्याचं आणि ह्या मुलांशी बोलण्याचं कुतूहल प्रबळ ठरलं आणि जून २०१८ च्या एका मंगळवारी, मी श्रीनगरच्या फ्लाईटमध्ये बसले.

दिवस १ला

आर्मीत काम करणाऱ्या किंवा रिटायर झालेल्या जवानांची तरुण मुलं. २०-२२ वर्षांची, खूप कष्टाने पदवी मिळवलेली. आणि आता केंद्र आणि राज्यशासनाच्या स्पर्धापरीक्षांसाठी तयारी करत होती. मानसिक बळ, मुलाखतीची तयारी, परीक्षेचे आणि दैनंदिन आयुष्यातले ताणतणाव आणि त्यांचं व्यवस्थापन अशा धर्तीवर आमचा हा ४ दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम होता.

मी माझ्या नेहमीच्या पद्धतीने काही खेळ, काही गंमती अशी ओळख करून घ्यायला सुरुवात केली. विषयाला सुरुवात झाली. शिकायला, ऐकायला अतिशय उत्सुक असे ते लाल, गोरेगोबरे चाळीस चेहरे, अजूनही माझ्या डोळ्यांसमोर येतात…सारं काही टिपून घेणाऱ्या स्पॉंजसारखी ही मुलं देहाचे कान करून, नजरेत प्राण आणून सारं शिकत होती, आत्मसात करायचा प्रयत्न करत होती. सुरुवातीची भीड काही वेळातच चेपली आणि मग ह्या माझ्या मित्रांकडून प्रश्नांचा धबधबाच सुरु झाला. हो धबधबाच म्हणायला हवं, कारण इतर ठिकाणी होणाऱ्या प्रश्नोत्तरांच्या पाचपटीने हे प्रश्न माझ्यावर येऊन आदळत होते! दुपारी एक वाजता जेवणाचा ब्रेक घ्यायचा होता… काटा अडीचवर जायला लागला तरी आमच्या गप्पा आणि प्रश्नोत्तरं काही संपेनात. शेवटी कॅप्टन विशालनी येऊन आम्हाला बळंच जेवायला नेलं.

जेवताना कॅप्टन विशाल आणि बाकी काही लोकांशी गप्पा झाल्या. हळूहळू सीमेवरच्या ह्या गावातलं, शहरातलं आयुष्य, त्यातली अनिश्चितता, रोजचा दिनक्रम पार पडतानाही येणाऱ्या असंख्य अडचणी आणि ह्या साऱ्यातूनही शिकायची, प्रगती करायची आणि देशासाठी काही करून दाखवायची आस असणारी ही तरुण मुलं… हा सारा पट  उलगडत गेला.. पहिला दिवस संपवताना एक मात्र माझ्या मनाशी पक्कं झालं. मुलाखतीची कौशल्ये, ‘स्व’ची ओळख, सुरक्षित शहरी रहाणीमानातली सारी उदाहरणे असा नेहमीचाआखीव रेखीव ट्रेनिंग प्रोग्रॅम द्यायचा नाही. ह्या सगळ्यांपेक्षा ह्या मुलांचे प्रश्न, त्यांच्या जाणीवा आणि त्यांना लागणारी कौशल्य ही वेगळी आहेत. त्यांना हवं ते, त्यांच्यासाठी उपयुक्त असं काहीतरी पुढच्या तीन दिवसात द्यायचं हे अगदी नक्की झालं. मनात त्याची रूपरेषा हळूहळू तयार व्हायला लागली. त्या विचारांच्या नादात, पण त्याहीपेक्षा सतत ऐकू येणाऱ्या गोळीबाराच्या आणि बॉम्बस्फोटांच्या आवाजाने, बराच वेळ झोप लागली नाही. 

दिवस २

ट्रेनिंग सेंटरला जायला मी तयार होता होताच, कॅप्टन विशामला घ्यायला आले. ‘जोरदार गोळीबार सुरु आहे त्यामुळे जाता जाता मुलांनाही आपल्या बसमध्ये घ्यायचे आहे.’ अगदी सहजपणे त्यांनी मला सांगितलं आणि अजून एक अनोखा दिवस आपल्यासमोर आहे ह्याची मी मनात खूणगाठ बांधली. स्फोटांचे आवाज, गोळीबाराचे ध्वनी ह्यांच्या पार्श्वसंगीतात आमचा आजचा वर्ग सुरु झाला. दरवेळी मोठा आवाज कानावर पडला की मी दचकत होते, मन क्षणभर का होईना, विचलित होत होतं. पण समोरची मुलं-मुली मात्र अगदी एकाग्रतेने विषयात गुंतली होती. परसदारापर्यंत येऊन फुटणारे बॉम्ब हे त्यांचं रोज सामोरं येणारं वास्तव! मी फारच गडबडले तर मिश्किल हसत ‘कोई नही मॅम, रोजका है ये, आप सेशन चालू रखो!” असं अगदी सहजपणे ही मुलं सांगत होती.

रोजच्या जगण्याची ही वस्तुस्थिती त्यांनी स्वीकारली होती. माझी अस्वस्थता वाढतच चालली होती. वयाच्या २१-२२ व्या वर्षी ह्या रोजच्या घटना, मृत्यू इतक्या जवळून बघताना काहीसा बधिरपणा आला असेल का ह्या मुलांना? 

मला मात्र अजूनही हे सगळं पचनी पडत नव्हतं. मी अभ्यासलेला विनाअट स्वीकार ह्या मुलांना कसा शिकवायचा? कशासाठी शिकवायचा? मानसिक स्वास्थ्य कसं टिकवावं ह्यावर मी ह्यांना मार्गदर्शन करावं?

पण ह्याच  मित्रांच्या गप्पांमधून मी हळूहळू स्वस्थ होत गेले. ह्या टोकाच्या परिस्थीशी नाईलाजास्तव ही मुलं जमवून घेतात कदाचित. पण नोकरी, वेगळा प्रांत – भाषा यांच्याशी जमवून घेणं, नकार आणि अपयश स्वीकारणं त्यांना कठीण जातंय, इतर तरुण मुलांप्रमाणेच. संभाषण कौशल्य, लोकांसोबत काम करण्याचा अनुभव, इथे थोडी मदत हवी आहे ह्या मुलांना. परत एकदा मी माझं ध्येय, समोरच्या मुलांची शिकण्याची तीव्र इच्छा आणि त्यांचे कष्ट डोळ्यासमोर आणले, आणि आमचा आजचा दिवसही रंगतच गेला.

आज संध्याकाळी खरंतर आर्मीच्या टीमने बॉर्डर पोस्टला भेट देण्याचा कार्यक्रम योजला होता. पण वाढत चाललेला तणाव आणि गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर अर्थातच तो प्लॅन रद्द करायला लागला. मग आतील भागात असलेल्या आर्मीच्या छावणीकडे आम्ही आमचा मोर्चा वळवला. जवान, ऑफिसर यांच्यासोबत गप्पा आणि कांदा -बटाटा भजी विथ चटणी! मेजर सुशांत ह्या एका दिलखुष अधिकाऱ्याशी ओळख झाली. ‘तुम्ही खूप छान हसता’ असं मी त्यांना म्हटल्यावर त्यांचं उत्तर फार इंटरेस्टिंग होतं! “मॅडम, ये २२ स्टीचेस कि स्पेशल स्माईल है, अच्छी तो होनीही है!” आणि मग वेगवेगळ्या चकमकी आणि त्यात मिळालेले ते टाके अशा सुरस युद्धकथा ऐकत, भज्यांचा आम्ही समाचार घेतला.नागरी जीवन, सीमेवरचं नागरी जीवन आणि फौजी आयुष्य ह्यावर गप्पा रंगात आल्या. ‘आपकेलिये और हमारेलिये पीस (शांतता) का मतलब बिलकुल अलग है जी. वो आपकी मुंबईमें सौ धक्के खाये है आदमी. हमारेलिये तो, सामने बारूद बीछी पडी है,  टॅब कोई हलचल ना होना मतलब शांती.’ “नींद आती है ये सब सोचके?” मी त्यांना विचारलं. ‘सही है जी, नींद नाही लागती रातमें, पर वो ये सोचकर नही लगती कि कही निन्दमेही दुश्मन मार ना दे. मरना तो है ही, पर सामनेसे २-४ दुश्मनको मारके मरे तो फिर सही है!’

त्या रात्रीही मला खूप वेळ झोप लागली नाही.. कानात बॉम्ब आणि गोळीबारासोबतच मेजर सुशांतचे हे शब्द खूपवेळ घुमत राहिले..

दिवस ३

एव्हाना सांबाची, तिथल्या आवाजांची,  माणसांची आणि पदोपदी स्तिमित होण्याची मला सवय व्हायला लागली होती. मुलांशी संवादाचे पूल छान बांधले गेले होते. शिकण्या-शिकवण्यात दिवस भराभर संपला. तसं सगळं नॉर्मल वाटत होतं, पण कधी काय होईल याचा नेम नाही हे एव्हाना समजलं होतं. आणि तसंच झालं… पुन्हा एकदा धूमधडाक्याचे आणि बंदुकीच्या फैरींचे आवाज कानावर आदळायला लागले. ट्रेनिंग होत होतं त्या शाळेपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर फायरिंग सुरु होतं. आर्मीच्या जवानांनी सगळ्यांना तातडीने जिप्सी गाड्यात कोंबलं आणि आम्ही तिथून निघालो. काही गोष्ट्टी तरी नजरेला पडल्याच… ६-७ वर्षाचा एक छोटू, त्याच्या पाठीत बॉम्बचा एक तुकडा घुसला होता, रक्तबंबाळ झाला होता तो.. एक गाय गोळी लागून कोसळली. बाकीही विध्वंस आजूबाजूला सुरूच होता… मन सुन्न होऊन गेलं . सकाळी ‘गुड मॉर्निंग’ करणारे माझ्या विद्यार्थीमित्रांचे ते उत्सुक, उत्फुल्ल चेहरे मला दिसायला लागले. रोजच्या दिवसाला ही मुलं हे सारं आजूबाजूला, जवळच्या-ओळखीच्या-नात्याच्या माणसात घडताना बघत होती. आणि तरीही त्यातले अनेक जण आर्म्ड फोर्सेस मध्ये यायचं म्हणून  तयारी करत होते! आपली ध्येयं, आपला ‘स्व’ किती नेमका जाणला होता ह्या मुलांनी!

दिवस ४

आजचा आमच्या प्रोग्रॅमचा अखेरचा दिवस. वेळ तर भराभर पळत होता. पहिल्या दिवशीची लाजरी बुजरी मुलं, आता त्या बुजरेपणाचा कुठे मागमूसही नव्हता. त्यांची देहबोली, चेहऱ्यावरचे भाव, त्यांचं संवादकौशल्य साऱ्यातला बदल आणि सहजपण अगदी जाणवत होतं. त्यांच्या स्वप्नांना आता सुरेख आकार आला होता, त्याला धारदार प्रयत्नांची जोड आता ही मुलं देणार होती. प्रयत्नांना, स्वतःत करायच्या बदलांसाठी त्यांना आता एक दिशा मिळाली होती, एक मॉडेल मिळालं होत. पण अजूनही त्यांचं मन भरलं नव्हतं, आणि खरंतर माझंही.

“मॅम, आप कब जा रहे हो?”

“परसो सुबह.”

खरंतर एखादा दिवस आजूबाजूचा भाग बघायचा म्हणून मी एक दिवस हातात ठेवला होता.

“तो फिर हम कल भी ट्रेनिंग करते है ना प्लीज!” त्यांचा आग्रह मला मोडता आला नाही. बाहेरच्या, त्यांनी ना बघितलेल्या जगातलं कोणी येऊन आपल्याशी बोलताय, समजून घेतंय, शिकवतंय ह्याचं त्यांना भलतंच अप्रूप वाटत होतं! दुसऱ्या दिवशी लंच पर्यंत आपण भेटायचं आणि मग मी अर्धा दिवस मोकळा घायचा असं ठरलं.

दिवस ५

आजूबाजूच्या गावातून आलेली ही सगळी मुलं. आयत्या वेळी बेत बदलला, तरीही चाळीसपैकी फक्त ८ मुलं परत गेली. उरलेली ३२ मंडळी परत सकाळी ट्रेनिंग हॉलला हजर! लंचपर्यंतचा वायदा होता…पण मुलांनी लंच ब्रेकच घेऊ दिला नाही. अखेर कॅप्टन विशालनी एका एका मुलाला त्याच्या घरी, गावी रवाना केलं. तत्पूर्वी, रडारड, मिठ्या, एकमेकांशी संपर्कात रहायचे वायदे… त्यांच्या निरपेक्ष आणि निरागस प्रेमाने मी हळवी  झाले,जाड मनाने सगळ्यांचा निरोप घेतला.

रात्री कंमान्डींग ऑफिसरच्या घरी डिनरचं आमंत्रण होतं. गप्पा छान  रंगल्या,बऱ्याच मुद्द्यांवर गरमागरम चर्चाही झडल्या. “ही मुलं खूप काही भोगत, सोसत, बघत मोठी होतात. पण छोट्याश्या जगातून मोठ्या शहरात गेल्यावर मात्र पार बुजून जातात. मोठाल्या संकंटांशी सामना करायला त्यांना परिस्थिती शिकवते, पण छोट्या मोठ्या शहरी प्रश्नांशी मात्र त्यांना अडखळायला होतं. पण जिद्द मात्र एकदम उमदा!” अर्थातच ह्यावर आमचं कोणाचंच दुमत नव्हतं.रात्री रूमवर परत येताना, ड्रायव्हरला म्हटलं, “आज माहोल ठीक लाग रहा है. शांती है काफ़ि.” अतिशय शांतपणे त्याने सांगितलं, ” कुछ तो बडा प्रोग्रॅम बन रहा है बॉर्डरपे, २-३ गाव खाली करवाये है आज. ” त्याच्या त्या स्थितप्रज्ञतेला मी घाबरलेल्या मनात प्रणाम केला. गेल्या पाच दिवसातील संचित आठवत कधी झोप लागली ते कळलंच नाही.

दिवस ६

परतीची फ्लाईट जम्मूहून सकाळी ११.३० ला. सांबा ते जम्मू प्रवासाला साधारण एक-दीड तास लागतो. त्या अंदाजाने सकाळी ८ ला निघाले. तर सांबामध्ये एवढा ट्रॅफिक जॅम की ३ तास झाले तरी मी अजून सांबातच होते. सगळं शहर जणू रस्त्यावर उताराला होतं, सगळे रस्ते माणसांनी आणि वाहनांनी, दुथडी भरून वाहत होते. माझा आता हळू हळू वैताग वाढायला लागला होता. नक्की काय घडलं आहे विचारलं तर कळलं की, सकाळच्या वेळात सांबा सोडून जाण्याचे आदेश सुमारे दहा हजार लोकांना देण्यात आले होते.

जम्मूला पोचून फ्लाईट पकडायची तर आता सूतराम शक्यता नव्हती. पण आता मला माझं ओळखीचं जीवन खुणावायला लागलं होतं, घरचे काळजी करायला लागले होते. काहीशा वैतागानेच मी माझ्यासोबत येणाऱ्या आर्मी एस्कॉर्ट ला म्हटलं, “तुम्हाला ठाऊक होतं ना हा प्रकार, मग मला लवकर निघायला का सांगितलं नाही?” त्याने कमालीच्या शांतपणे उत्तर दिलं, “कॉन्फिडेंनशिअल बात राहती है मॅम, हमी खुद्द को भी पता नही राहता, के हमी क्या कुछ पता है!” एक सणसणीत चपराक बसल्यासारखं झालं. 

फ्लाईट चुकली होती. १८,००० रूपये भरून पुढलं बुकिंग घ्या असं जेट च्या ग्राउंड स्टाफ ने सांगितलं आणि माझा अजूनच संताप झाला. फोन फिरवून, ओळखी काढून, ६००० रुपयात पुढलं तिकीट मिळवलं. आणि मनात येऊन गेलं, की आलीस तू काश्मीरच्या, सांबाच्या बाहेर, तुझ्या मूळ जगात. तुझ्या तथाकथित अति महत्वाच्या प्रश्नांकडे आणि मुद्द्यांवर. मी पुण्याला येऊन पोचले खरी, पण काहीशी बदलूनच. सांबातली मी आणि माझ्यातलं सांबा, आता कायमचं मैत्र जुळलं होतं!