Blog

मनोगती – On Mind's Trail

शुभंकर : पापण्यांमागचे पाणी आणि आभाळाएवढं मन

जगामध्ये रहाणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे एक टक्के व्यक्ती ‘स्किझोफ्रेनिया’ ह्या मानसिक आजाराने बाधित असतात असे आकडेवारी सांगते. ०.८​ टक्के असो की १ टक्का, ही संख्या प्रचंड आहे. भारतासारख्या देशामध्ये मानसिक आजारावरच्या उपचार आणि पुनर्वसनाच्या सोयी जरी मर्यादित असल्या तरी आजपर्यंत कुटुंबव्यवस्थेने आमच्या अशा अनेक रुग्णांना आधार दिला . . . अगदी आजपर्यंत.

पण बदलाच्या गतीपासून कोणाला अलिप्त रहाता येते ? आज वयवर्षे चाळीस ते साठ ह्या वयोगटातील असे रुग्ण आणि वयाने त्यांच्यापेक्षा दोन-अडीच दशकांनी मोठे पालक किंवा चार-पाच वर्षाच्या अंतरातले सहचर किंवा सहचरी अशी अनेक कुटुंबे आहेत. घरातील भावंडे पांगली, मुले विखुरली. आता हा रुग्ण (ज्याला आम्ही म्हणतो शुभार्थी) आणि त्याचे एक किंवा दोन कुटुंबीय (ज्यांना शब्द आहे शुभंकर) असे एकत्र रहाताहेत . . . फक्त महाराष्ट्राचा विचार केला तरी अशी कुटुंबे कित्येक हजाराच्या घरात आहेत.

आधुनिक औषधयोजनेमुळे आज बहुसंख्य शुभार्थींच्या आजाराची लक्षणे ताब्यात रहातात. त्यातले काहीजण नोकरी करू शकतात. काहीजण छोटा व्यवसाय करतात . . . पण कोणतेही अर्थार्जन न करू शकणाऱ्या शुभार्थीचा भार पूर्णपणे ह्या शुभंकरांवरच असतो. ह्यातील काहीजण आर्थिक सुस्थितीत आहेत तर काही शुभंकर वयाच्या सत्तरी मध्येही अर्थार्जन करताहेत . . . आम्हा मनोविकारतज्ञांच्या दवाखान्यांमध्ये नियमित येणाऱ्या अशा शुभंकरांचे पिकलेपण आम्हाला नेहमी जाणवत असतं. . . एकेकाळी ज्या मुलाकडून, मुलीकडून नॉर्मल जगण्याच्या अपेक्षा होत्या त्या पूर्णपणे कोमेजलेल्या. आजूबाजूच्या जगाला टाकावू वस्तूंप्रमाणेच अशा निरुद्योगी माणसांमध्येही फारसा रस नसतोच. महिन्या-दोन महिन्यानंतर औषधाच्या फॉलोअपला जेव्हा हे शुभंकर येतात तेव्हा त्यांच्या नजरेत नेहमीच एक प्रश्न असतो . . . कधी विचारतात, कधी गिळून टाकतात . . . ‘आमच्यानंतर काय ?’ हा तो प्रश्न.

जगामध्ये आणि भारतामध्येही ह्या प्रश्नावर उत्तरे काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ज्या देशांमध्ये लोकसंख्या मर्यादित आणि सामाजिक सुविधा पोहोचवणारी यंत्रणा कार्यरत आहे तिथे हा प्रश्न आवाक्यात असतो. आपल्याकडे मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना आयुष्यभर ठेवणारी केंद्रे हाताच्या बोटावर मोजण्याएवढी. खाजगी संस्थांचे शुल्क अनेकांना न परवडणारे. अशा वेळी शुभंकरानी एकत्र येऊन, दोन-तीन शुभार्थींसाठी ‘ग्रीन हाऊस’ तयार केले तर . . . कुटुंबीयांनी एकत्र येऊन एका शुभार्थींची देखभाल क्रमाक्रमाने केली तर. एखादी वस्ती, सोसायटी ह्यांनी एकत्र येऊन आपापल्या भागातील अशा व्यक्तींसाठी काम केले तर? . . . एक लक्षात घेऊ की मी जरी हा मजकूर स्किझोफ्रेनियाच्या संदर्भात लिहित असलो तरी हा प्रश्न व्यापक आहे . .. मतीमंद, ऑटीझम अर्थात स्वमग्नता, सेरेब्रल पाल्सी आणि अतिवृद्ध ह्या सर्वांच्याच शुभंकरांसमोर हा प्रश्न उभा आहे ‘आमच्यानंतर काय ?’ म्हणून ह्या संपूर्ण गटासाठी वस्तीपातळी, गावपातळीवरही हा प्रश्न हातात घेणे महत्वाचे आहे.

दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलती आणि हक्क आता मनोरुग्णांसाठी तसेच स्वमग्नतेच्या व्यक्तींसाठीही मिळू लागले आहेत. पण त्याची योग्य माहिती शुभंकरांना नसते. ‘फॅमिली ट्रस्ट’ कसा काढावा, आर्थिक गुंतवणूक कशी करावी, इच्छापत्रामध्ये शुभंकरांनी नेमके काय लिहावे ह्या गोष्टींबद्दलही माहिती कमी असते.

शुभार्थींच्या कायमस्वरूपी निवासासाठी संपूर्ण देशभरात चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगांची माहितीसुद्धा शुभंकरांसमोर आणणे गरजेचे आहे. आमच्या आय.पी.एच. संस्थेतर्फे यंदाच्या १ मे ला सकाळी ९:३० ते ६:०० ह्या वेळामध्ये एका शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. स्किझोफ्रेनियाचे शुभार्थी आणि शुभंकर ह्यांचे बरोबर गेली अठ्ठावीस वर्षे सातत्याने उपचार-पुनर्वसनाचे काम करणारी ही संस्था.

आमच्या अनेक शुभंकरांची एक अडचण असते. स्वतःच्या शुभार्थींची काळजी घेताघेता त्यांची मनशक्ती क्षीण होऊ लागते. जीवनाकडे ते यंत्रवत पाहू लागतात. ह्या प्रक्रियेला म्हणतात ‘Burn out’. तरीही हे शुभंकर धीर सोडत नाहीत. स्वतःच्या आयुष्याची संध्याकाळ त्यांना दिसत असतेच. आणि चाळीशी-पन्नाशीच्या घरातल्या शुभार्थीच्या जगण्यातला त्यानंतरचा अंधार त्यांना भेडसावतो. आपल्या सभोवती रहाणाऱ्या अशा एखाद्या शुभार्थी-शुभंकर कुटुंबासाठी आपण काय करू शकतो असा विचार त्या इमारतीमध्ये, चाळीमध्ये रहाणाऱ्या अगदी दोन-तीन कुटुंबांनी जरी केला तरी त्यातूनही एक पर्याय निर्माण होऊ शकतो. अनेक गृहनिर्माण संस्थांचे सभासद आपल्या तिथल्याही ‘सत्ता’स्थानांसाठी लढाया खेळतात. ती उर्जा जर अशा कुटुंबांसाठी त्या त्या इमारतीमध्येच एक ‘आधारव्यवस्था’ करण्यासाठी वापरता येईल. भौगोलिक अंतराने लांब राहणारे कुटुंबीय आणि स्थानिक शेजारी एकत्र येऊ शकतील का? . . . मनोविकाराची दिव्यांगता अदृश्य असते . . . पण ती तितकीच विदारक असते . . .

रस्त्यावरच्या निराधार शुभार्थींच्यासाठी आपल्या महाराष्ट्रात नगर जिल्ह्यातले डॉ. धामणे पतीपत्नी, कर्जतमधले डॉ. भरत वाटवानी असे काही प्रकल्प अमाप करुणेने चालवले जात आहेत. पुण्याची ‘सा’ (Schizophrenia Awareness Association) शुभार्थींसाठी दिनसुविधा केंद्र चालवते. डोंबिवलीच्या डॉ. अद्वैत पाध्ये व सहकारीसुद्धा असे केंद्र चालवतात. आय.पी.एच.संस्थेतर्फे शुभार्थी आणि शुभंकर ह्यांची सहकारी तत्वावरची ‘त्रिदल’ ही व्यवसाय पुनर्वसन कार्यशाळा चालवली जाते. महाराष्ट्रातील शुभंकरांसाठी नियमित प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. आमच्या नियमित संपर्कामध्ये असणाऱ्या शुभार्थींसाठी एक सहकारी तत्वावरचे ‘ग्रीन हाऊस’ तयार करण्यासाठी कुटुंबांना एकत्र कसे आणता येईल ह्यावर एक योजना तयार होत आहे . . . घराघरातल्या थकलेल्या शुभंकरांना दिलासा देण्यासाठी स्वकेंद्रिततेच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाऱ्या, अनेक सुहृदांची गरज आहे.

दिनांक १ मे २०१८ च्या परिषदेसाठी ज्या शुभंकरांना येण्याची इच्छा आहे त्यांनी अधिक माहिती आणि नोंदणीसाठी जरूर संपर्क साधावा. संपर्कासाठी फोन नं. संध्या भास्कर – 9870115693.

Email id – iphthane@gmail.com

आय.पी.एच.पुणेसाठी भावी स्वयंसेवक

आय.पी.एच. अर्थात इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेचे काम आता पुणे शहरात सुद्धा सुरू झाले आहे.

आपल्या सर्वांच्या मनामध्ये दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. परंतु कधीकधी आपल्याला दिशा मिळत नसते. एखाद्या विषयात रस असतो पण त्या कामाचे आणि आपल्या वेळाचे गणित नीटपणे बसत नाही. कधीकधी आपण सातत्य आणि चिकाटीमध्ये कमी पडतो. मधूनच उद्भवणाऱ्या वैयक्तिक, कौटुंबिक अडचणी तर असतातच.

म्हणजे स्वयंसेवकाच्या वृत्तीला योग्य वळण कसे द्यायचे हा आपल्यापुढचा प्रश्न असतो. लोकांना / संस्थेला मदत करताना स्वतःचा भावनिक लाभ जरूर डोळ्यापुढे ठेवावा. ह्या कामातून मी अधिक चांगला माणूस बनणार आहे ना, असे स्वतःला सांगावे … म्हणजे ‘स्वयंसेवा’ म्हणजे ‘परोपकार’ नव्हे हे आपल्या ध्यानात राहील.

मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करताना स्वयंसेवकांना सामना करावा लागतो समाजातील, मानसिक आरोग्यविषयक गैरसमजांचा. परंतु ह्या क्षेत्रातले कार्यरत स्वयंसेवक हाच मानसिक आरोग्याच्या कलंकमुक्तीचा (Destigmatization ) सज्जड पुरावा असतो.

आय.पी.एच.मध्ये स्वयंसेवकांचे प्रशिक्षण आणि सहभाग ह्याला आपण अतिशय महत्त्वपूर्ण स्थान देतो. म्हणूनच आय.पी.एच.चे स्वयंसेवकत्व ही एक विचारपूर्वक घेण्याची जबाबदारी आहे तसेच त्यामध्ये स्वयंविकास, सामाजिक बांधिलकी आणि ‘देण्याचा आनंद’ असे अनेक महत्त्वाचे पैलू आहेत.

स्वयंसेवकांनी भरून देण्यासाठी एक माहितीचा फॉर्म तयार केला असून त्यासाठी office@iphpune.org येथे अथवा 25474705 / 06 या क्रमांकावर श्री प्रदीप कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.

मनआरोग्य क्षेत्रातील प्रभावी युती : ठाणे आणि पुणे

संस्था उभारणीच्या कामाला लागून बत्तीस वर्षांचा काळ लोटला ह्याची नव्याने जाणीव होते आहे … मनोविकार शास्त्रामध्ये एम.डी.ची पदवी मिळाल्यानंतर दोन वर्षे मुंबईच्या केईएम रुग्णालयात पूर्णवेळ लेक्चरर म्हणून काम केले. त्या काळात गर्दच्या उपचारासंदर्भात जनजागृती केली, गटउपचार घेतले, पोलिसांसोबत काम केले, शिबिरे घेतली … काम करणारा मी एकांडा होतो तरी  केईएमच्या यंत्रणेचा आणि नावाचा भक्कम पाठिंबा होता. म्हणूनच मी  केईएम सोडू नये असा माझ्या एका सरांचा सल्ला होता. पण आमच्याच क्षेत्रातले माझे दुसरे गुरू मात्र म्हणाले की ह्या कुंपणात राहू नकोस. तुझ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी स्वतःच उचल.

त्यांचे ऐकून बाहेर पडलो. एव्हाना पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना अनिल- सुनंदा अवचटांच्या पुढाकाराने आणि पु. ल., सुनीताबाईंच्या मदतीने झाली होती. २९ ऑगस्ट  १९८६ च्या सकाळी, बाबा आमटेंच्या आशीर्वादाने मुक्तांगणचे उदघाटन झाले तेव्हा त्या समारंभाचे सूत्रसंचालन मीच करत होतो. म्हणजे माझ्या संस्थारूप कामाचा श्रीगणेशा झाला तो खरेतर पुण्यामध्ये.

मुक्तांगणमधून बाहेर पडणाऱ्या रूग्णांसाठी ठाण्यामध्ये डे-केअर सेंटर सुरू केले ते १९८७ मध्ये. डॉ. श्याम आणि सुनीती कणबूरांनी त्यांच्या रुग्णालयाची जागा निःशुल्क दिली म्हणून. हे केंद्र बऱ्यापैकी गजबजू लागले. ग्रीटिंग्स कार्ड्स, आकाशकंदील, ख्रिसमस ट्रीज तयार करण्याचा वर्कशॉप सुरू झाला. १९८९ साली व्यसनातून बाहेर पडणाऱ्या तरूण मित्रांना सोबत घेऊन एक जनजागरण कार्यक्रम केला ‘ड्रग फाईट – एटीनाईन’. सारी शाळा कॉलेजेस ढवळून काढली परिसरामधली …  आता कुमारवयीन मुले आणि त्यांचे पालक यायला लागले सल्ल्यासाठी. त्यातून ‘ टफ टीन क्लब’च्या बैठकी सुरू झाल्या. ‘ युथ क्लब ‘चे ट्रेक निघू लागले. आणि १९९० साली मी फाईलमधून बाहेर काढली १९८२ साली लिहिलेली एक योजना … समाज आणि मनआरोग्य ह्यातील दरी सांधणारी, ज्ञान आणि विज्ञानाचे पूल बांधणारी एक संस्थारूपी चळवळ सुरू करायची आहे. आय.पी.एच. …. इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ!

आता मदतीला मंडळी होती. ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ. शुभा थत्ते होत्या. उत्साही पेशंट्स होते. युथक्लबचे तरूणतरूणी होत्या. ठाण्याच्या कारखानीस हॉस्पिटलच्या डॉक्टर मॅडमनी तीन रिकाम्या खोल्या दिल्या. दोन वर्षे निःशुल्क वापरण्यासाठी. गडकरी रंगायतनमध्ये नाटकाचा प्रयोग लावला. तिकीट विक्री केली. स्मरणिका काढली. आणि आमचे पहिले आर्थिक बळ उभे झाले ते तब्बल सत्तर हजाराचे. तिकीट खपवण्यासाठी, जाहिराती मिळवण्यासाठी रिक्शा- स्कुटर – पायी अशी केलेली तंगडतोड अजूनही त्या त्या रस्त्यांवरून जाताना आठवते.

२३ मार्च १९९०ला आय.पी.एच. केंद्र सुरू झाले आणि संस्थेद्वारे मनआरोग्यातले विविध उपक्रम करण्याचा धडाका आम्ही सुरू केला. स्किझोफ्रेनिया, एपिलेप्सी ह्या आजारांवरच्या लोकपरिषदा असोत की विचारी पालकत्वावरचे नियमित व्यासपीठ ‘मंथन’. मुलांची शिबिरे तर सुरूच होती. मनोविकारावर सर्वंकष सेवा, मानसिक विसंवादावर समुपदेशन आणि मानसिक विकासासाठी प्रत्येक वयोगटासाठी उपक्रम….

मानसशास्त्रीय चाचण्या, बालकपालक मार्गदर्शन, कुमारवयीन मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन अशा त्यावेळी काळाच्या पुढे वाटणाऱ्या अनेक सेवा धारीष्ट्याने सुरू केल्या. संस्था सुरू झाल्यापासून तीन वर्षातच एका मोठ्या आर्थिक आरिष्टाला तोंड देत पुन्हा सावरलो. भाड्याच्या एका जागेतून दुसऱ्या जागेत जात राहिलो …. तक्रार न करता काम करत गेलो. त्यातून समाजाचा विश्वास मिळवत गेलो. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी ठाणे शहरात स्वतःची जागा घेण्याच्या इराद्याने प्रयत्न सुरू केले. पुन्हा एकदा निधी जमवण्यासाठी धावपळ. अकरा वर्षांपूर्वी पाडव्याच्या दिवशी आमच्या ६५०० स्क्वेअर फूटाच्या, तीन मजल्याच्या जागेत आम्ही आलो.

असे वाटले की आता ही जागा प्रशस्त आहे. पुढे काही करायला नको. पण गेल्या दशकामध्ये उपक्रम आणि प्रकल्प वाढले. ‘आकलन’ हा आमचा व्यावसायिकांचे प्रशिक्षण करणारा विभाग, ‘आवाहन’ हा माध्यम विभाग, ‘इलिगन्स’ हा कॉर्पोरेट प्रशिक्षण विभाग, ‘त्रिदल’ हे स्किझोफ्रेनीयाच्या रूग्णांचे पुनर्वसन केंद्र … तऱ्हतऱ्हेचे स्वमदत गट, शिक्षक – पालकांसाठीचे उपक्रम ….एकाचवेळी १३८ verticals वर इथून काम सुरू असते. आज आम्ही ७२ मानसिक आरोग्य व्यावसायिक, ४८ पूर्णवेळ मदतनीस, १०० च्यावर प्रशिक्षित कार्यकर्ते असा सव्वा दोनशेचा परिवार झालाय हा.

२०१७ साली हा पसारा अजूनच वाढला. ठाण्याच्या मनोरुग्णालयाच्या मालकीचा पण त्या आवारापासून जरा दूर असलेला एक प्रशस्त परिसर वापरण्यासाठी  आय.पी.एच. आणि राज्य सरकारचा सार्वजनिक आरोग्य विभाग ह्यांचेमध्ये समन्वयपत्र तयार झाले. स्किझोफ्रेनीयाचे रूग्ण आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांच्या त्रिदल कार्यशाळेसाठी प्रशस्त इमारत मिळाली. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे दिनसुविधा केंद्र सुरू झाले. मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी नियमित प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. जिल्हा परिषदेचे शिक्षक, स्पेशल मुलांचे पालक या ह्यांच्याबरोबरचे प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. हे सारे उपक्रम पूर्णपणे विनामूल्य आहेत. ह्या परिसराचे नाव आहे ‘ सप्तसोपान’, तिथे दिडशे लोक बसू शकतील असे खुले व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांमधले रोलमॉडेल्स सादर करण्याचा मासिक कट्टा सुरू झाला आहे. दर महिन्याला ‘मनतरंग’ हा फिल्म क्लब सुरू झाला आहे. ह्या परिसराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आय.पी.एच.ची वीस आसनी बसही निःशुल्क सेवा देऊ लागली आहे.

दरम्यान, मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी म्हणून येऊ लागले. यंदाच्या वर्षी तर सुमारे दोनशे दिवस विविध प्रशिक्षणक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. आय.पी.एच.पासून पाच मिनिटांच्या अंतरावर एका स्वयंपूर्ण बंगल्याचे नूतनीकरण करून तेथून सुरू झाले आहे ‘मैत्रघर’ हे अतिथीगृह. आठ ते नऊ व्यक्तींसाठी रहाण्याची घरगुती आणि आरामदायक सोय.

सुमारे पाच महिन्यांपूर्वी हे सारे प्रकल्प पूर्ण होताना वाटत होते की आता खूप झालं … थांबावं आता !

संध्याकाळी घरी गप्पा मारताना माझी मानसकन्या, सायकिअॅट्रीस्ट डॉ. सुखदा म्हणाली, “तुझ्या लक्षात आले का बाबा … गेल्या महिन्यात मी रांगेने अकरा दिवस पुण्यात कार्यक्रम घेत होते.” मी म्हणालो, ” खरंच की !” माझे आणि आय.पी.एच.मधल्या सर्व सहकाऱ्यांचे पुण्यामधले भाषणाचे कार्यक्रम, कार्यशाळा, शिबीरे तुडुंब भरतात … शेवटी एकच प्रश्न,” पुण्यात का नाही  आय.पी.एच. सुरू करत ?”  आय.पी.एच.च्या केंद्रामध्ये सकाळी दहा ते रात्री नऊ ह्या वेळात सरासरी १३० कुटुंबे आरोग्यसेवा घेण्यासाठी येतात. त्यात रोज पुण्याहून येणारी कुटुंबे असतात सरासरी ८ ते १०. आज पुणे परिसरातील सुमारे १२०० कुटुंबे ठाण्याच्या फॉलोअपवर आहेत.

त्यात भर पडली ती पुणे वेधच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाची. १९९१ साली ठाण्यामध्ये सुरु केलेली वेध व्यवसाय परिषद आता ठाण्यासह एकूण अकरा शहरांमध्ये भरते. यंदा पुण्यातले तिचे आठवे वर्ष. ज्येष्ठ शिक्षक दीपक पळशीकर सर आहेत ह्या गटाचे संघटक. शिवाय मुक्तांगणचा सारा परिवार आहेच की …. का नको सुरू करूया आय.पी.एच. पुण्यामध्ये ? …

“तू पुण्याला शिफ्ट होऊन जबाबदारी घेणार तर करू आपण सुरु ” मी सुखदाला म्हणालो. तिने होकार दिला. आणि सुरुवात झाली आणखी एका बाळंतपणाची. हो… बाळंतपणच ते! विचार आणि कल्पना रूजण्यापासून ते संस्थेचा दिनक्रम सुरू होण्यापर्यंतचा काळ सारा प्रेग्नन्सीचा … विनोदाचा भाग सोडून देऊ पण पुण्यामध्ये एक कोअर ग्रुप तयार केला. त्यात विविध वयोगटातील आणि व्यवसायातील लोक एकत्र आले. डॉ. मोहन आगाशे, अनिल अवचट (माझा बाबा), डॉ. विकास नाडकर्णी (माझा दादा) ह्यांच्या अध्यक्षतेखाली सारा गट काम करू लागला. कर्वेनगर भागामधला एक बंगला भाडेतत्वावर नक्की केला. त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले. पुण्यातल्या हितचिंतकांची एक बैठक घेतली ३० जानेवारीला. त्याला शंभरावर मंडळी आली. लहानमोठ्या देणग्यांचा ओघ सुरू झाला. वेगवेगळ्या कंपन्यांच्या, सामाजिक बांधिलकी ​विभागांकडे योजना सादर केल्या चर्चा झाल्या. ह्या प्रयत्नांनाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पुण्याच्या केंद्रामध्ये ठाण्यात मिळणाऱ्या सेवा तर मिळतीलच. त्याशिवाय इथे आरोग्य क्षेत्रातील स्वसहाय्य गटांचे एक Hub, केंद्रस्थान निर्माण करण्याचा संकल्प सोडला आहे. त्याच पद्धतीने मानसशास्त्र, मनोविकारशास्त्र, समुपदेशन  ह्या साऱ्या क्षेत्रातील पदवीपूर्व, पदव्युत्तर विदयार्थी तसेच प्रॅक्टिस करणारे मानसशास्त्रज्ञ ह्यांच्यासाठी विनामूल्य शैक्षणिक अभ्यासगट घेण्याची योजना मी तयार केली आहे. पदवीपूर्व विदयार्थ्यांच्या ह्या अभ्यासगटाचे नाव असेल ‘अवांतर’ …. मास्टर्सच्या विदयार्थ्यांसाठी ‘समांतर’…… आणि प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी ‘निरंतर’. हे मासिक अभ्यासगट यंदा जुलै महिन्यापासून सुरु होतील. ठाणे आय.पी.एच्.च्या शिक्षक गुणसंवर्धन प्रकल्पामध्ये पुण्याच्या काही शाळा आधीपासून सहभागी आहेत. त्यामध्येही आता भर पडेल. खेळाडूंचे मनोबल वाढवणाऱ्या आमच्या ‘मिशन एक्सलन्स’ ह्या विभागाचे कामही आता पुण्याहून सुरु होईल.

पुणे परिसरातील आय.बी.एम्., भारत फोर्ज, सिमेन्स अशा कंपन्यांसोबत आय.पी.एच्. कार्यरत आहे. त्यामध्ये आता बजाज फिनसर्व्ह, पर्सिस्टंट अशा कंपन्यांच्या सहभागाची भर पडणार आहे. आर अँड डी पॉलीप्रॉडक्ट्स, मोरडे फूड प्रॉडक्ट्स, प्राज इंडस्ट्रीज ह्या कंपन्यांनी ह्या निमित्ताने  आय.पी.एच्.च्या कार्याला आर्थिक पाठिंबा दिला.

मार्च महिन्याच्या चोवीस तारखेला आय.पी.एच्. पुणे कार्याला सुरुवात करेल. २३ मार्च हा ठाण्याचा स्थापना दिन. त्या दिवशी ठाण्याची टीम पुण्याच्या टीमला, ‘ शुभास्ते पंथानः सन्तु’ म्हणणार आहे. पुण्यात आपले काम सुरु करावे ही कल्पना आणि ती प्रत्यक्षात येण्याचा दिवस ह्यात पाच महिन्यांचे अंतर आहे….. तरीही ती Full Term Normal Delivery असणार…. कशातून वाटतो आहे मला हा कॉन्फीडन्स ?

बत्तीस वर्षांपूर्वी मी एक व्यक्ती होतो…. एकटी व्यक्ती होतो….. .  मानसिक आरोग्य क्षेत्राचे नवे आयाम, नव्या दिशा शोधायच्या आहेत असा ध्यास मात्र त्यावेळीही आजच्या इतकाच उत्कट होता…..त्यात मला मिळू शकणाऱ्या मान्यता, प्रसिद्धीपेक्षाही, माझ्या ज्ञानशाखेचे महत्व समाजात रुजावे हा ध्यास होता. आज आम्ही एलीट कमांडो फोर्सेसपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंपर्यंत आणि तरुण उद्योजकांपासून ते उभरत्या गायकांपर्यंतच्या अनेक गटांबरोबर काम करतोय्  ….. And our inputs are making a difference. आज माझ्या ज्ञानशाखेबद्दलची जाण समाजात अधिक विकसित झली आहे म्हणून आज असा प्रतिसाद मिळतो आहे. ह्या संस्थेच्या निमित्ताने ज्या शेकडो व्यावसायिकांनी, स्वयंसेवकांनी, कार्यकर्त्यांनी हातभार लावला आहे आणि लावत आहेत त्या साऱ्यांमुळे आज ही व्यक्तीपलीकडे जाणारी, समाजाची चळवळ होऊ पहात आहे.

आजचा काळही संक्रमणाचा आहे. मनआरोग्यक्षेत्रासाठी नव्या आव्हानांमध्ये नव्या संधी शोधण्याचा आहे. अशावेळी  आय्.पी.एच्.सारखी संस्था तीन दशकांनंतरही नव्या दमाने, नव्या उभारीने आपले काम विस्तारात आहे ही गोष्ट महत्वाची.

आय्.पी.एच्.ला वीस वर्षे झाली तेंव्हा प्रसिद्ध झालेल्या.’शहाण्यांचा सायकिअॅट्रीस्ट’ ह्या पुस्तकामध्ये मी लिहिले होते की आय्.पी.एच्. च्या शाखा काढण्यामध्ये मला रस नाही. दहा वर्षानंतर माझे मत असे बनले आहे की आय्.पी.एच्. चा आकृतिबंध, पुनरावृत्त व्हायला हवा ….. Replicate व्हायला हवा. तरच त्याला शास्त्रीय आकृतिबंध मानता येईल. आणि त्यासाठी नव्या पिढीच्या हातामध्ये  लगाम देणेही आवश्यक आहेच की. त्यांच्यामागे आपली शक्ती उभी करणेही महत्वाचे. ठाण्याच्या आय्.पी.एच्.मध्येही पुढच्या तीन वर्षांमध्ये नवी नेतृत्वफळी तयार करण्याची ‘IPH GenNEXT’ ही योजनाही सुरु होत आहे…. थोडक्यात काय तर बत्तीस वर्षांनंतरही मी आज मस्त मजेत आणि प्रचंड बिझी आहे. वैयक्तिकपणे रूग्ण पाहण्यामधला माझा वेळ मला मर्यादित करावा लागला आहे. पण गुणी सहकारी ती गरज पूर्ण करू लागले आहेत. आणि आता माझी शक्ती सहकाऱ्यांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी वापरणे गरजेचे झाले आहे.

तर बत्तीसवर्षाच्या काळात खूप चढउतार पाहिले पण दिशा राहिली ती उन्नती आणि प्रगतीची. विनोबांचे असे उद्धृधृत आहे कि आज मनोविकारांच्या विरोधात ब्रह्मविद्येबरोबरच विज्ञानही उभे राहणार आहे… वीस वर्षांपूर्वी वाचले, तेंव्हापासून विनोबांचा आशीर्वाद म्हणून हे विधान मनात धारण केले आहे… आय्.पी.एच्. संस्था सुरु झाली तेंव्हा अचानकपणे संस्थेचे बोधवाक्य सुचले होते….Mental Health for All…. सुदृढ मन सर्वांसाठी ! आजही हे वाक्य तितकेच अनुरूप आहे…… ऊर्जा मात्र अनेकांच्या सहभागामुळे अधिक तेजाळलेली आहे.

आरोग्यक्षेत्रातील स्वसहाय्य गटांचा खराखुरा ‘सेतू’

जगण्याच्या प्रवासामध्ये माणसासमोर कोणतीही समस्या आली की तिच्या तीव्रतेनुसार त्याच्या डोक्यात विचार चालू होतात ते एकटेपणाचे . . . हे असं मलाच का झालं? . . . माझे नशीब खराब . . .  ही वेदना ज्याच्या वाट्याला आली तो मी दुर्देवी . . .  असे विचार घोंघावायला लागतात. तो जगापासून, कुटुंबापासुन आणि शेवटी स्वतःपासूनही तुटुन जायला लागतो. एकाकीपणाचा कोश जितका घट्ट होत जातो तशी समस्येला तोंड देण्याची त्या व्यक्तीची शक्ती मर्यादित होत जाते . . . आणि कमनशिबी असण्याचा ग्रह अधिक घट्ट होतो.

अशा टप्प्यावर जर एकाच समस्येने ग्रासलेल्या व्यक्ती एकत्र आल्या, एकमेकांशी बोलल्या तर त्यांना मानसिक उर्जा मिळते हा इतिहासात सिद्ध झालेला प्रमाण अनुभव म्हणता येईल. आरोग्यक्षेत्रातील दोन उदाहरणे घेऊया . . .  १९३५ साली अमेरिकेतल्या ओहायो राज्यातील अॅक्रन शहरामध्ये बील नावाचा न्यूयॉर्कमधला स्टॊकब्रोकर आणि बॉब नावाचा स्थानिक सर्जन एकमेकांना भेटले. दोघेही मद्यपाशाच्या विळख्यात होते. म्हणजे ‘नैसगिक’पणे ते दोघे मद्यप्राशन करतील असे अपेक्षित होते . . . पण घडलं वेगळेच. बीलने बॉबला समजावले की मद्यप्राश हा विचार, भावना, वर्तनाचा ‘आजार’ आहे. बॉब डॉक्टर होता तरी त्याला ही कल्पना नवी होती. व्यसन हा एक आजार आहे ह्या भूमिकेवरून दोघांच्या व्यसनमुक्तीची वाटचाल सुरु झाली. अॅक्रनच्या शहर रुग्णालयातील व्यसनी लोकांपर्यंत ते पोहोचले. त्यातला एक ‘सोबर’ झाला. ह्या तिघांच्या ‘मिटींग’ मधून सुरु झाला अल्कोहॉलीक ऍनॉनिमस हा आज अनेक देशांमध्ये पसरलेला स्वसहाय्य गट . . . १८० देश आणि ११८००० स्वमदत गट असलेली ही चळवळ आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे.

हॅरीयट शेल्टर आणि बिव्हर्ली यंग ह्या दोन स्त्रिया १९७९ मध्ये मॅडीसन ह्या व्हिस्कॉनसीन राज्यातील शहरात एकत्र आल्या. दोघींच्या मुलांना होता स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार. उपचारव्यवस्थेमध्ये कुटुंबाचा सहभाग असावा ह्या हेतूने तसेच एकमेकांना आधार देण्यासाठी त्या भेटू लागल्या. त्यातून जन्माला आला National Aliance for Mentally Ill अर्थात NAMI हा आधारगट. आज ह्या स्वसहाय्यसंस्थेचे हजाराहून अधिक गट अमेरिकेत भरतात.

आरोग्यक्षेत्रातील विविध आजार आणि समस्यांच्या संदर्भात ही कहाणी जगभर गिरवली गेली आहे. पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संस्थापक डॉ. अनिता उर्फ सुनंदा अवचट ह्यांच्याबरोबर पंचवीस वर्षापूर्वी आम्ही सहजीवन गटाच्या सभा सुरु केल्या. व्यसनाधीनतेमधून बाहेर येणारा पती आणि त्याची पत्नी ह्यांचा हा विकासगट . . . त्यामधून ह्या साऱ्या स्त्रियांना उर्जा मिळाली. मुक्तांगणमध्ये अशा स्त्रियांचा आधारगट सुरु झाला. त्याचे नाव ‘सहचरी’ गट. ह्या गटातर्फे मुक्तांगणमध्ये एक सहचरी किचन सुरु झाले. हळूहळू महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये सहचरी गट स्थापन झाले. ह्या गटांची महाराष्ट्रव्यापी परिषद भरू लागली. तीन वर्षांपासून ठाण्यामध्ये हा गट नियमितपणे भेटू लागला. पंचवीस ते तीस सदस्यसंख्या असलेल्या ह्या गटातर्फे गेल्या जानेवारीपासून ‘सहचरी स्वादम’ ह्या किचनला सुरुवात झाली.

सामाजिक आरोग्य चळवळीमध्ये, अशा आधारगटांचे महत्व नव्याने अधोरेखीत करावे अशी वेळ आली आहे. त्यामागची प्रमुख कारणे अशी. कोणत्याही आजाराच्या संदर्भामध्ये आपल्या समाजामध्ये अजूनही कुटुंबाचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. कोणत्याही आरोग्यसमस्येतून बाहेर यायचे तर कुटुंबाचा सहभाग महत्वाचा. म्हणून कुटुंबीयांचे आधारगट वाढले तर त्यातून आपोआपच आरोग्यसेवा देणाऱ्या यंत्रणांवर वचक निर्माण होतो. न्यूझीलंडसारख्या देशामध्ये मानसिक आजारांवरच्या औषधांचे विक्रीदर ठरवताना सरकारी यंत्रणा कुटुंबगटांना सहभागी करते.

आरोग्य समस्यांमधून जाणाऱ्या व्यक्तींचे गट त्या त्या व्यक्तीला ‘पेशंट’ ह्या भूमिकेपासून मुक्त व्हायला मदत करतात. डॉक्टरी उपचार घेताना मी रुग्ण भूमिका घेईन पण बाकीचे आयुष्य जगताना हे जोखड बाजूला ठेवून सकारात्मक जगेन अशी ऊर्जा आधारगट निर्माण करतात. अनुभव तर आपण सारेच घेतो परंतु स्वतःच्या आणि इतरांच्या अनुभवाकडे निरीक्षक-परीक्षक दृष्टीने कसे पहावे आणि त्यातली नेमकी शिकवण कोणती घ्यावी हे आधारगटांमधून व्यक्तीला कळू लागते. त्याचा परिणाम एकंदर विकासावर, Recovery process वर होतो.

ठाण्याच्या आय.पी.एच. मानसिक आरोग्यसंस्थेमध्ये असे अनेक स्वसहाय्यगट भरतात. स्किझोफ्रेनियाचे रुग्ण (शुभार्थी), त्यांचे कुटुंबीय (शुभंकर), गंभीर मानसिक आजारातून सावरणारे (ट्रेंडसेटर्स), मंत्रचळेपणाची समस्या असणारे

ओसीडीचे रुग्ण व कुटुंबीय (परफेक्ट ग्रुप) एपिलेप्सी गट, व्यसनमुक्ती गट, सहचरी गट, व्यसनमुक्तीच्या वाटेवरच्या कुटुंबातील मुलांसाठी अंकुर गट हे काही प्रमुख गट. स्पेशल मुलांच्या पालकांसाठीचा एक गट आणि एलजीबीटी समूहासाठी एक गट असे अजून गट लवकरच सुरु होतील.

अर्थात ह्या उपक्रमाचा भर राहिला आहे मानसिक आरोग्याशी संबंधित विषयांवर. परंतु शारीरिक आजार असोत, दिव्यांगता असो किंवा जीवनचक्राच्या अखेरच्या टप्प्यावरचे डिमेन्शिया-पार्किनसनसारखे मज्जासंस्थेचे विकार असोत . . . आधारगटांची गरज तर सर्वत्र आहे.

अनेक शहरांमध्ये असे आधारगट सुरु आहेत. त्यांना आय.पी.एच.ने जसे ठाण्यात केले तसे एका छताखाली आणता येईल का? आय.पी.एच.चे सर्व आधारगट संस्थेच्या प्रवासामध्ये, संस्थेच्या उपक्रमातून सुरु होत गेले. म्हणजे ते त्या अर्थाने एका छताखालीच आकाराला आले. परंतु अस्तित्वात असलेल्या आधारगटांना एका छताखाली आणले तर त्या सर्व गटांचा एकत्रीत ठसा आरोग्यचळवळीवर उमटवता येईल.

पुणे शहरामध्ये आय.पी.एच.चे उपक्रमकेंद्र उभारायचे ठरले तेव्हा माझ्या मनातल्या ह्या विचाराने उचल खाल्ली. आरोग्यविषयक स्वसहाय्यगट चालवणाऱ्यांची संख्या पुण्यामध्ये मोठी आहे. अस्तित्वात असलेल्या डझनभर गटांसोबत तर माझा स्वतःचा संपर्क राहिला आहे. ह्या गटांचा समन्वय करणारा केंद्रगट म्हणून ‘सेतू’ नावाची संकल्पना काही वर्षांपूर्वी, ह्या गटातील कार्यकर्ते आणि पुण्यातले ज्येष्ठ मनोविकारतज्ञ डॉ. उल्हास  लुकतुके ह्यांनी राबवली होती. कालांतराने ती विस्कळीत झाली.

संबंधितांशी बोलताना जाणवले की सर्व सहाय्यगट जर नियमितपणे एका ठिकाणी भरू लागले तर त्यांचा ठसा अधिक उमटेल. प्रसार माध्यमांचा वापर एकत्रीतपणे करता येईल. आय.पी.एच. मनआरोग्य केंद्राच्या पुण्याच्या केंद्राची आखणी करतानाच गट भरवण्यासाठीच्या जागा आम्ही जागेच्या डिझाईनमध्ये घेतल्या. आता योजना अशी आहे की अस्तित्वात असलेले आरोग्य स्वमदत गट आणि आमच्या संस्थेच्या पुढाकाराने निर्माण होणारे काही गट असे मिळून बारा ते पंधरा गट दर महिन्याला ह्या केंद्रातून भरू लागतील. अस्तित्वात असलेल्या गटांना जागेची सोय, नि:शूल्कपणे मिळेलच. परंतु येणाऱ्या सभासदांचे आतिथ्य, पाहुणे तज्ञ आणायचे झाल्यास त्यांचे मानधन-प्रवास ह्यासाठीही आय.पी.एच. सहाय्य्य करेल.

स्वसहाय्यगट घेणाऱ्या कार्यकर्त्यांची कौशल्ये वाढवण्यासाठी दर दोन महिन्याला एक ह्याप्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये सहा कार्यशाळांचे आयोजन करायचे असा बेत आहे. अनुभवाने कार्यकर्ते शिकतातच. आतून आलेल्या आस्थेच्या बळामुळे टिकतातच. पण त्यांना शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळाले तर स्वमदत गट घेण्याची कला अधिक विकसित होईल. ह्या विषयावरचा सहा सत्रांचा आणि अठरा तासाचा एक अभ्यासक्रम मी तयार केला आहे. इतर तज्ञांचीही मदत घेता येईल. आरोग्यक्षेत्रातील अनेक तज्ञांना ह्या सभांमध्ये सहभागी करून घेता येईल.

दिनांक २४ मार्चला, पुण्याच्या आय.पी. एच. केंद्राचे उदघाटन होईल त्यावेळी सुमारे बारा स्वमदत गटांच्या ह्या केंद्राचे वेळापत्रकच जाहीर करण्याचा आमचा विचार आहे.

अधिक माहितीसाठी : (M) 7588098053 / 54 /55 / 56 / 57

पत्ता : ‘अनैशा’, प्लॉट क्र. ४, यशश्री कॉलनी, वेदांत नगरीजवळ, डी. पी. रोड, कर्वेनगर, पुणे-411052

खुणेच्या जागा : राजाराम पूलाकडून कमिन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी हॉटेलच्या समोरची गल्ली

शुभंकर : पापण्यांमागचे पाणी आणि आभाळाएवढं मन

जगामध्ये रहाणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे …

आय.पी.एच.पुणेसाठी भावी स्वयंसेवक

आय.पी.एच. अर्थात इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ …

मनआरोग्य क्षेत्रातील प्रभावी युती : ठाणे आणि पुणे

संस्था उभारणीच्या कामाला लागून बत्तीस वर्षांचा …